Thursday, 4 January 2018

Bhima Koregaon details

इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग १ ते ७

-----------------------------------

१ जानेवारी आता एका आठवड्यावर आलाय. अनेकांना ह्याच दिवशी सुमारे २०० वर्षांपूर्वी झालेल्या एक छोट्याश्या लढाईची आठवण अगदी न चुकता येते - ती म्हणजे भीमा कोरेगावची लढाई.  ही लढाई जरी दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात झाली असली तरी पेशव्याच्या सैन्याप्रमाणे कंपनीच्या सैन्यातही अनेक जाती-धर्मांचे लोक होते. पण तरीही ह्या लढाईचा विषय निघाला की काही लोक 'कोणी' 'कोणाचे' किती मारले वगैरे घटना आणि आकडे वाट्टेल तसे फुगवून सांगतात. पुराव्याचा वगैरे संबंध नाहीच. कागदपत्रांच्या आधारे बोलायचं झालं तर आपल्याकडे ह्या लढाईबद्दलचे उपलब्ध असलेले सगळे कागद पेशवे दप्तरातले - मग ते खरे आहेत का आणि कसे असतील वगैरे बिनबुडाचे आरोप होतात. अभ्यासक उत्तरे देऊन कंटाळून जातात पण अनैतिहासिक प्रश्न थांबतच नाहीत. त्यामुळे ह्या वर्षी भीमा कोरेगाव लढाईच्या प्रकरणावर ब्रिटिश लायब्ररीच्या कागदपत्रांच्या आधारे एका वेगळ्या कोनातून उजेड टाकायचा हा एक उपक्रम 'इतिहासाच्या पाऊलखुणा' हा समूह हाती घेतोय. येथे ३१ डिसेंबरपर्यंत दररोज ब्रिटिश लायब्ररीतली ह्यापूर्वी अप्रकाशित कागदपत्रे मांडली जातील. त्यांवर सर्व बाजूंनी आणि सर्व उपलब्ध साधने वापरून ससंदर्भ साधकबाधक चर्चा होणे हे अपेक्षित आहे.

आजच्या ह्या पहिल्या भागात ही लढाई नेमकी कुठे झाली आणि दोन्ही सैन्यं कोणत्या प्रकारे एकमेकांसमोर ठाकलेली होती हे बघूया.

भीमा कोरेगाव हे पुण्यातल्या शिरूर तालुक्यातलं एक छोटंसं गाव. गावाच्या दक्षिणेकडून भीमा नदी वाहते. गावाच्या ईशान्येला शिरूरकडून येणारा रस्ता होता तर भीमा नदी ओलांडून नैऋत्येकडे पुण्याकडे जाणारा रस्ता होता. दुसरे बाजीराव पेशवे आपल्या सैन्यासह इंग्रजी फौजांना हुलकावण्या देत आणि गनिमी काव्याचा उत्तम प्रकारे वापर करत, इंग्रजांना दमवून पुढे जात होते. खुद्द बाजीरावांच्या फौजेतील अगदी खासे सोडल्यास कोणालाही आपण कुठे जात आहोत याची खबर नसे. एखाद्या गावात ते उतरल्या नंतर मुद्दाम वेगळ्याच वाटांची चौकशी करत आणि जात मात्र वेगळ्याच वाटेने, जेणेकरून नंतर इंग्रज गावातल्या लोकांना पेशवे कुठे गेले विचारत आणि वेगळ्याच मार्गाने जात. दि. ३० डिसेंबर रोजी बाजीराव आणि छत्रपती महाराज संगमनेरकडून, ब्राह्मणवाड्याचा घाट उतरून चाकणला येऊन दाखल झाले. पुण्यातल्या लोकांमध्ये अशी हूल उठली की बाजीराव पुन्हा पुणे जिंकणार. अगदी १७३८ शकातील हकीकतीतही याचे उल्लेख आपल्याला सापडतात. बाजीराव इंग्रजांना झुकांड्या देत फिरून पुन्हा पुण्याच्या अगदी जवळ आले आणि तरीही स्मिथ त्यांना पकडू शकला नाही हे बाजीरावांच्या गनिमी काव्याचं यश आणि स्मिथचे अपयशच म्हणावे लागेल. पुण्याच्या बंदोबस्तासाठी असलेला कर्नल बर नावाचा इंग्रज अधिकारी या वार्तेने धास्तावला. स्मिथ बाजीरावांना पकडू शकला नाही आणि आता बाजीराव जवळ आले या धास्तीने त्याने शिरूरला असलेल्या कॅप्टन स्टॉन्टन या अधिकाऱ्याला मदतीला पाचारण केले. मराठ्यांच्या फौजेचा नक्की अंदाज बांधता येत नाही, पण सुमारे वीस हजार घोडेस्वार आणि आठ हजार पायदळ यावेळी बाजीरावांकडे असावे असे दिसते. बाजीरावांनी पुन्हा एकदा पुणे जिंकण्याची हूल उठली असतानाच ते स्वतः मात्र साताऱ्याच्या रोखाने निघाले होते.

३१ डिसेंबर १८१७ च्या रात्री ८ वाजता बॉम्बे नेटीव्ह आर्मीची एक बटालियन (सुमारे हजार सैनिक),  मद्रास आर्टिलरीच्या दोन ६ पाउंडर तोफा व त्यावरील अधिकारी, आणि २५० घोडेस्वार घेऊन कॅप्टन स्टॉन्टन शिरूरकडून पुण्याकडे निघाला होता. रात्रभर प्रवास करून १ जानेवारी १८१८ रोजी हे सगळे कोरेगावपासून दोन मैलांवर पोहोचले होते तेव्हा त्यांना अचानक नदीपलीकडील पेशव्याचे सैन्य दिसले. पेशव्याचे सैन्य फुलशहराकडून येत होते. त्यांच्या सैन्यात खुद्द दुसरा बाजीराव पेशवा, बापू गोखले आणि त्रिंबकजी डेंगळेंसारखी मातब्बर मंडळी तसेच सुमारे २०००० घोडेस्वार, आठ हजार पायदळ आणि दोन तोफा होत्या. ह्याचबरोबर अरब पालटणीही होत्या. इतक्या मोठ्या सैन्याशी खुल्या मैदानात निभाव लागू शकत नसल्याने गडबडीतच स्टॉन्टन त्याचे सैन्य कोरेगावात न्यायच्या ऑर्डर्स दिल्या. सकाळी ११ वाजेपर्यंत स्टँटनचे सैन्य गावात गेलेले होते. पण गावाच्या आजूबाजूला बघतात तो काय - पेशव्याच्या घोडेस्वारांनी संपूर्ण गाव घेरलेले होते. शिरूरला जायचा रस्ता आणि पुण्याला जायचा रस्ता संपूर्णपणे बंद केलेला होता. नदीपलीकडून पेशव्याची एक मोठी तोफ कोरेगावावर रोखलेली होती. हे कमी की काय म्हणून पेशव्याच्या सैन्यातले सुमारे २००० अरब कोरेगाव गावात घुसले होते आणि त्यांनी कापाकापी सुरु केलेली होती. आणि खुद्द दुसऱ्या बाजीराव पेशव्याची छावणी पश्चिमेस पडलेली होती.

स्टॉन्टनचे संपूर्ण सैन्य कोरेगावात अडकलेले आणि सभोवती पेशव्याच्या सैन्याचा वेढा पडलेला. जवळून भीमा नदी वाहते आहे पण प्यायला पाणी नाही.

नकाशा स्रोत: 'Sketch of the column at Corygaum, with a plan of the village, some letters private and public, the general orders and the despatch relating to the action on the 1st January, 1818' - by John Wylie [1839]

British Library Shelf-mark: 10057.pp.10
इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग २

----------------------------------------------------

मागच्या भागांत आपण पाहिलं की कोणत्या परिस्थितीत स्टॉन्टनने त्याच्या सैन्याला कोरेगावात जायच्या ऑर्डर्स दिल्या होत्या. ह्या भागांत आपण पाहूयात की तेथे नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या.

सकाळी ११ वाजेपर्यंत स्टॉन्टनचे सैन्य कोरेगावात आश्रयाला गेलेले होते. गावाभोवती लगेचच पेशव्याच्या घोडेस्वारांचा वेढा पडलेला होता पण ते लगेच गावात घुसले नव्हते. स्टॉन्टनच्या सैन्याने तेवढ्यात असलेल्या दोन तोफा घेऊन मोर्चेबांधणी सुरु केली. मद्रास आर्टिलरीचे २६ शिपाई - जे ह्या दोन तोफांबरोबर होते - ह्या कामाला लागले. स्टॉन्टनने एक तोफ गावाच्या पश्चिमेला ठेवली - जेणेकरून भीमा नदीच्या किनाऱ्यावर लक्ष ठेवता येईल. दुसरी तोफ गावाच्या मध्यवर्ती ठेवायचा त्याचा विचार होता - जेणेकरून शिरूरकडून येणाऱ्या रस्त्यावर नीट लक्ष ठेवता येईल तसेच गावात जर कोणते सैन्य आले तर त्याचाही प्रतिकार करता येईल. स्टॉन्टनचे २५० घोडेस्वारही कोरेगावच्या उत्तर आणि ईशान्य दिशेला टेहेळणी करत फिरत होते.

आता पेशव्याची व्यूहरचना पाहूयात. स्मिथ आणि बरचे इंग्रज सैन्य पेशव्याच्या मागावर होते हे त्यांना माहिती होतेच. त्यामुळे ह्या कोरेगावच्या लढाईत जास्त वेळ काढण्याची इच्छा पेशव्याची नव्हतीच पण समोर आलेल्या स्टॉन्टनच्या सैन्याला तोंड देणे भाग होते. शिवाय छत्रपतीही सोबत होते त्यामुळे कोणतीही जोखीम घेणेही अयोग्य होते. समोर स्टॉन्टनचे सैन्य अचानक आल्याने त्याचा सामना करणे भागच होते. पेशव्यानी छावणी नदीच्या पलीकडे नैऋत्येला टाकली. पेशव्याचे गोखले, रास्ते आणि निपाणकर देसाई हे तीन सरदार आपल्या सैन्यासह कोरेगावावर चालून जाण्यास सज्ज झालेले होते. या सरदारांनी आपापल्या तुकडीतल्या घोडेस्वारांना कोरेगावाला वेढा द्यायचे हुकूम सुटले. सोबतची एक तोफ त्यांच्याबरोबर पाठवून देण्यात आली. स्टॉन्टन कोरेगावाच्या मधोमध तोफ ठेवतोय हे पाहून पेशव्याच्या सैन्यातल्या अरबांच्या प्रत्येकी १००० अश्या तीन तुकड्या बनवण्यात आल्या. त्या तीन मार्गांनी कोरेगावाच्या पूर्व आणि आग्नेयेकडून स्टॉन्टनच्या सैन्यावर तुटून पडल्या. ह्या दोन्ही सैन्यांच्या धुमश्चक्रीत गावातली अनेक घरे पेटली. अरबांनी पहिला मोठा हल्ला केला त्यात मद्रास आर्टिलरीचा चिशोम नावाचा अधिकारी डोक्यात गोळी लागून ठार झाला. इंग्रजांची एक तोफही काबीज झाली. ह्या चिशोमचे डोके कापून बक्षिसाच्या आशेने ते अरबांनी पेशव्याकडे पाठवून दिले. ह्या मधल्या वेळात अजून मराठी सैन्य कोरेगावात घुसले. त्यांनी एका तोफेची मोर्चेबांधणी केली. (नकाशातली तोफ ३) दुसरी तोफ नदीपलीकडून गोळे टाकत होतीच.(नकाशातली तोफ ४).

स्टॉन्टनच्या सैन्यात असलेले अर्ध्याहून अधिक युरोपिअन अधिकारी अरबांनी जायबंदी करून टाकलेले होते. एका पडक्या देवळात ह्यापैकी तीन जखमी अधिकारी लपून बसलेले होते. त्यातील असिस्टंट सर्जन विंगेटने बाहेर पडायचा प्रयत्न केला. अरब पलटणी तेथे आल्या आणि त्यांनी विंगेटच्या शरीराचे अक्षशः तुकडे-तुकडे करून टाकले. आतमध्ये लेफ्टनंट स्वान्स्टन आणि लेफ्टनंट कोनेलनही जायबंदी होऊन पडलेले होते. अरब त्यांनाही मारणार इतक्यात असिस्टंट सर्जन वायली तेथे सैन्य घेऊन धावून गेला आणि त्याने ह्या दोघांना वाचवले.

चिशोम मेल्यावर इंग्रजांची कोरेगावातली तोफ (नकाशातली तोफ २) मराठ्यांनी जिंकून घेतलेली होती. तोफेशेजारीच लेफ्टनंट पॅटिन्सन गोळी लागून जायबंदी होऊन पडलेला होता. तोफ मराठ्यांनी जिंकली आहे हे पाहून हा सहा फूट सात इंच उंचीचा धिप्पाड अधिकारी तश्या अवस्थेतही उठला आणि त्यांनी मराठ्यांवर हल्ला सुरु केला. हे बघून इंग्रज सैन्याला जरासा चेव आला आणि त्यांनी ती तोफ पुन्हा जिंकून घेतली. मराठेही आता गावातल्या इमारतींमध्ये आणि तेथे असलेल्या एका गढीमध्ये दबा धरून बसले. गावाभोवती मराठी घोडेस्वारांचा वेढा होताच. अश्या परिस्थितीत रात्री ९ वाजता ह्या चकमकी थांबल्या. मराठ्यांच्या या आक्रमकी हल्ल्याचे दोन हेतू होते. एकतर पेशव्याला साताऱ्याच्या दिशेने जाण्यासाठी वाट करून देऊन सैन्याची पिछाडी निर्धास्त करायची, आणि त्यातही मागून येणारे स्मिथचे सैन्य आणि या पलटणीचे एकत्रीकरण रोखायचे. हे दोन्हीही हेतू रात्रीपर्यंत साध्य झाले होते. स्टॉन्टनच्या पलटणीचा जवळपास सगळा दम निघून गेला होता आणि आता इंग्रजांशी अजून भांडून वेळ काढण्यात अर्थ नव्हता हे पाहून मराठी फौजा हळूहळू मागे फिरून पेशव्याच्या दिशेने जाण्याचा विचार करू लागल्या. या काळात पेशवा स्वतः छत्रपतींसह राजेवाडीच्या मुक्कामावर गेला होता.

३१ डिसेंबरची संपूर्ण रात्र प्रवास केलेले स्टॉन्टनचे सैन्य संपूर्ण थकून गेलेले होते. आता तर ते संपूर्णपणे कोरेगावातल्या वेढ्यात अडकून बसले होते. मराठी सैन्याने त्यांचे पाणीही तोडून टाकले होते. तसे पाहता युरोपिअन अधिकाऱ्यांपैकी फक्त कॅप्टन स्टॉन्टन, लेफ्टनंट जोन्स, आणि असिस्टंट सर्जन वायली हेच फक्त लढायच्या परिस्थितीत होते. बाकीचे युरोपिअन अधिकारी कोणत्याही प्रकारे लढायच्या परिस्थितीतही नव्हते. प्रवासाचे आणि चकमकीचे अतिश्रम आणि खायला प्यायला काही नाही ह्या परिस्थितीमध्ये स्टॉन्टनला बाकीचे अधिकारी मराठा सैन्याला शरण जायचा सल्ला देत होते पण त्याने तो मानला नाही. अश्या परिस्थितीत रात्री ९ वाजता ह्या चकमकी थांबल्या. स्टॉन्टनच्या ८३४ सैनिकांपैकी २७५ मारले गेलेले होते. अरब धरून मराठ्यांचेही ५०० ते ६०० लोक मारले गेले होते.
इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ३

-------------------------------------------

मागच्या लेखात आपण १ जानेवारी १८१८च्या सकाळच्या घडामोडी बघितल्या. इंग्रजांचा किंवा मराठ्यांचा - कोणाचाही निश्चित विजय झालेला नव्हता. मराठ्यांना त्यांनी पेचात पकडलेल्या स्टॉन्टनच्या छोट्याश्या सैन्यावर विजय मिळवून काही फारसे साध्य होणार नव्हते कारण ह्या इंग्रज सैन्यात कोणी मोठा अधिकारी किंवा महत्त्वाचा माणूस नव्हता. मराठा सैन्यात बापू गोखले, त्रिंबकजी डेंगळे मंडळींबरोबर दुसरा बाजीराव पेशवा आणि प्रत्यक्ष सातारकर छत्रपती प्रतापसिंह महाराज होते. ह्यांची छावणी नदीच्या दक्षिणेला होती. स्टॉन्टनला कोणतीही पुढची इंग्रजी कुमक यायच्या आत ह्या खाश्याना सुखरूप पुढच्या मुक्कामी पोहोचवणे हे मराठी सैन्याचे मुख्य ध्येय होते. त्यामुळे कोरेगावचा वेढा फारसा ताणण्यात त्यांना काही स्वारस्य नव्हते. १ जानेवारीच्या रात्री मराठी फौजा हळूहळू मागे फिरून पेशव्याच्या दिशेने जाण्याचा विचार करू लागल्या होत्या. या काळात नदीच्या पलीकडे असणारा पेशवा स्वतः छत्रपतींसह तेथून निघून जाऊन राजेवाडीच्या मुक्कामावर गेला होता.

इंग्रज सैन्याचे भरपूर नुकसान झालेले होते. जरी दोन्ही तोफा ताब्यात असल्या तरी मद्रास आर्टिलरीमधले जवळपास सगळे सैनिक आणि अधिकारी मारले गेलेले किंवा जायबंदी झालेले होते. सैन्याला ४८ तास अन्न किंवा पाणी मिळालेले नव्हते पण तरीही ते स्टॉन्टनच्या निर्णयानुसार शरण न जाता त्याच्यावर विश्वास ठेऊन तसेच थांबलेले होते कारण स्टॉन्टनला आशा होती की कर्नल स्मिथ किंवा कर्नल बरची मदत लवकर येईल. स्मिथ आणि बर हे दोघेही त्यांच्या सैन्यांच्या तुकड्या घेऊन पेशव्याच्या मागावर निघालेले होते त्यामुळे पेशव्याचा माग काढत ते कोरेगावाजवळ येतील ही स्टॉन्टनची अटकळ अगदीच चुकीची नव्हती असे नक्कीच म्हणता येते. पण हे असले तरी स्टॉन्टनला वस्तुस्थितीची व्यवस्थित जाणीव होती. २ जानेवारीला मराठा सैन्याने पुन्हा जर जोमाने हल्ला केला तर आपण खचितच वाचणार नाही हे त्याला पूर्णपणे ठाऊक होते. १ जानेवारीलाच त्याने कोरेगाव मुक्कामाहून रात्री ८ वाजता कर्नल स्मिथला एक पत्र पाठवले. त्यात तो लिहितो - "We are completely surrounded by the Peishwa's Army, and cannot defend ourselves longer than tonight. We have lost many men and officers, send us aid, or we are all cut up tomorrow" (म्हणजे "आम्ही पेशव्याच्या सैन्याने संपूर्ण घेरले गेलेलो आहोत आणि आज रात्रीपेक्षा जास्त तग  धरू शकत नाही. आमचे बरेच शिपाई आणि अधिकारी मारलेले गेलेले आहेत. आम्हाला [लवकर] मदत पाठवा नाहीतर हे उद्या आम्हालाही कापून टाकतील") हे पत्र स्मिथने मुंबईचा गव्हर्नर सर इव्हान नेपिअन ह्याला पाठवलं. ब्रिटिश लायब्ररीत सर इव्हान नेपिअनच्या पत्रव्यवहारांत हे पत्र आजही जपून ठेवलेलं आहे.

म्हणजे आता परिस्थिती पहा. मराठे सहज स्टॉन्टनच्या सैन्याची कत्तल करू शकत होते पण त्यांना ते करण्यात काही स्वारस्य नव्हते. त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते पेशवा आणि सातारकर छत्रपतींची सुरक्षा. स्टॉन्टनला डळमळीत आशा होती की त्याला मदत येईल पण नक्की माहीत नव्हते. २ जानेवारी उजाडला.

२ जानेवारीच्या दिवशीच राजेवाडी मुक्कामाला असलेल्या मराठी फौजा साताऱ्याच्या रोखाने कूच करून पुढे गेल्या होत्या. मागून येणाऱ्या गोखले-रास्ते-देसाईंच्या तुकड्याही मुख्य फौजेला जाऊन मिळाल्या.

स्टॉन्टनने २ तारखेला काय काय केलं ते त्याच्याच शब्दात पाहूया. हे पत्र स्टॉन्टनने त्याचा शिरूरमधला कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल फिट्झसायमन ह्याला ३ जानेवारी १८१८ रोजी लिहिलेले आहे. ह्यात २ जानेवारीबद्दल स्टॉन्टन लिहितो "...At day break on the morning of the 2nd we took possession of the post the enemy had occupied the day before, but they did not attempt to molest us. On the evening of the 2nd despairing of being able to make my way good to Poonah, and my men having been 48 hours without food, and no prospect of procuring any in the deserted village we had taken post in, I determined upon the attempt to retreat; and having collected the whole of the wounded, secured the two Guns and one Tumbril for moving, I commenced my retreat at 7 PM being under the necessity of destroying one empty Tubril, and leaving the camp equipage; under under this explanation I trust I shall be justified in the steps, I have taken..." (म्हणजे "..२ जानेवारीला सकाळी शत्रूंने (मराठ्यांनी) काबीज केलेल्या जागा आम्ही हस्तगत केल्या पण त्यांनी कोणताही प्रतिकार केला नाही. २ जानेवारीच्या संध्याकाळी आमचा पुण्याला जायचा मार्ग मोकळा झाला होता पण गेले ४८ तास तयार अन्न पाणी न मिळाल्याने आणि पुढे कुठे त्याची सोय होणार नसल्याने मी (पुण्याला न जाता पुन्हा शिरूरला) माघारी वळण्याचा निर्णय घेतला. सगळ्या जखमी शिपायांना, दोन्ही तोफांना, आणि एक सामानगाडी घेऊन संध्याकाळी ७ वाजता आम्ही (शिरूरकडे) परतीचा प्रवास सुरु केला. एक रिकामी सामानगाडीची आम्ही (कोरेगावात) विल्हेवाट लावली आणि काही तंबू वगैरेचे सामानही तिथेच सोडून दिले. ह्या वर्णनावरून मी घेतलेल्या निर्णयांची तुम्हाला कल्पना येऊ शकते...".

म्हणजे २ जानेवारीला कोणतीही विशेष लढाई न करता स्टॉन्टनचे इंग्रजी सैन्य आले तिथून शिरूरकडे निघून गेले. मराठ्यांचे सैन्य पुण्याकडे न वळता साताऱ्याच्या दिशेने निघून गेले. स्टॉन्टनला कोणाचीही मदत आली नाही पण मराठा सैन्य निघून गेल्याने तो बचावला. स्टॉन्टनचा कोणत्याही प्रकारे जय झाला नाही किंवा मराठ्यांचा पराजय झाला नाही कारण तसे झाले असते तर पेशव्याला आणि सातारकर प्रतापसिंह छत्रपतींना पकडायला स्टॉन्टन त्यांच्या मागावर गेला असता पण तसे काहीच झाले नाही. उलट पुण्याची कुमक करायला निघालेला स्टॉन्टन आल्या वाटेने पुन्हा शिरूरला निघून गेला.

पण हे सगळं झालं तरी काही प्रश्न उरतातच - मग कोरेगावात तो स्तंभ का उभारला आहे? त्याच्या मागची इंग्रजांची मानसिकता काय होती? कोरेगावची लढाई इतकी महत्त्वाची का होती? एल्फिन्स्टन वगैरे लोकांचे कोरेगाव लढाईबद्दल काय मत होते? हे आणि ह्यासारख्या अजून प्रश्नांची उत्तरे पाहूया पुढच्या भागांत.

संदर्भ:

सर इव्हान नेपिअन पेपर्स (ब्रिटिश लायब्ररी कॅटलॉग Mss Eur D666: 1812-1820)
'Sketch of the column at Corygaum, with a plan of the village, some letters private and public, the general orders and the despatch relating to the action on the 1st January, 1818' - by John Wylie [1839]
इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ४
-------------------------------------------

मागच्या भागात आपण पाहिले की २ जानेवारीला कोणतीही विशेष लढाई न करता स्टॉन्टनचे इंग्रजी सैन्य आले तिथून शिरूरकडे निघून गेले. मराठ्यांचे सैन्य पुण्याकडे न वळता साताऱ्याच्या दिशेने निघून गेले. स्टॉन्टनला कोणाचीही मदत आली नाही पण मराठा सैन्य निघून गेल्याने तो बचावला. स्टॉन्टनचा कोणत्याही प्रकारे जय झाला नाही किंवा मराठ्यांचा पराजय झाला नाही कारण तसे झाले असते तर पेशव्याला आणि सातारकर प्रतापसिंह छत्रपतींना पकडायला स्टॉन्टन त्यांच्या मागावर गेला असता पण तसे काहीच झाले नाही. उलट पुण्याची कुमक करायला निघालेला स्टॉन्टन आल्या वाटेने पुन्हा शिरूरला निघून गेला.

एलफिन्स्टन पुणे दरबारात कंपनीचा रेसिडंट होता. या पूर्वीच्या रेसिडेंट असलेल्या बॅरी क्लोजचा आणि पेशव्याचा बऱ्यापैकी सलोखा असल्याने इंग्रज 'घुसखोरी' करण्याइतकी मजल मारत नसत. पण इ.स. १८११ मध्ये क्लोजच्या जागी माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनची नेमणूक झाली आणि इंग्रजांच्या पुणे दरबारातील हालचाली पूर्णपणे बदलल्या. एल्फिन्स्टनने मराठ्यांचे पूर्ण राज्य गिळंकृत करण्याचा डाव रचला, आणि गंगाधरशास्त्र्याच्या खुनापासून याची सुरुवात झाली. शास्त्र्याच्या खुनाच्या आरोपात त्रिंबकजीला अडकवून त्याकरवी बाजीरावावर दबाव आणून एल्फिन्स्टनने युद्धाला सुरुवात करण्याचा मोठा डाव रचला. बाजीरावाचीही यावेळी युद्धाची तयारी सुरूच होती आणि अखेरीस ठिणगी पडली. कोरेगावची लढाई झाली तेव्हा एलफिन्स्टन चाकणच्या जवळपास होता. एलफिन्स्टन त्याची एक रोजनिशी लिहीत असे. ह्यात महत्त्वाच्या घटना अथवा लढाया ह्याच्याबद्दलचे त्याचे स्वतःचे विचार त्याने लिहिलेले आहेत. एलफिन्स्टनच्या सगळ्या डायऱ्या ब्रिटिश लायब्ररीत जपून ठेवलेल्या आहेत. ह्या कोरेगावच्या लढाईबद्दल एलफिन्स्टनचे काय मत होते ते पाहूयात.

३ जानेवारीला एलफिन्स्टन कोरेगावपासून साडेअठरा मैलांवर होता. ३ जानेवारीच्या त्याच्या जर्नलमध्ये ही नोंद आहे. एल्फिन्स्टन लिहितो:

"In consequence we marched at 3 for this place our impression at starting was the battalion was destroyed and that the Peishwa’s army was flushed with victory and aware of our small numbers was halted probably in some strong position to receive us. On the road the reports of the villagers made us more sanguine and at length a letter from Coats removed all doubt and relieved us from most of our anxieties. The battalion had taken post was hard pressed and lost 2 officers killed (poor young Wingate was one of them) and 3 or 4 wounded out of the 8. Most of the artillery men were killed with many of the sepoys when the whole were saved by the flight of the Peishwa, alarmed at the near approach of Gen Smith..."

("आम्ही ३ वाजता इकडून (कोरेगावपासून १८.५ मैलांवरून कोरेगावला जायला) निघालो. आमची अटकळ अशी होती की (स्टॉन्टनच्या) बटालियनचा बीमोड झालेला असून पेशव्याचे विजयी सैन्य आमच्या छोट्याश्या सैन्याचा अंदाज येऊन कोणत्यातरी भक्कम परिस्थितीत आमच्याशी सामना करायच्या तयारीत थांबलेले असेल. वाटेत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्हाला जरा हायसं वाटलं आणि कोट्सकडून आलेल्या पत्रामुळे आमच्या सर्व शंकांचे निरसन होऊन आम्ही चिंतामुक्त झालो. त्या बटालियनला खूप त्रास झाला आणि एकूण आठपैकी त्यांचे दोन अधिकारी मारले गेले (विंगेट त्यातला एक) आणि ३ ते ४ जायबंदी झालेत. तोफखान्यावरचे सगळ्यात जास्त शिपाई मारले गेलेत आणि बाकीचे स्मिथ येत आहे ह्या बातमीमुळे निघून गेलेल्या पेशव्यामुळे वाचलेत (नाहीतर तेही मारले गेले असते!) ")

एल्फिन्स्टन ६ जानेवारीला शिरूरला पोहोचला आणि तो स्वतः स्टॉन्टनला भेटला. त्याच्याशी कोरेगावच्या लढाईबद्दल बोलणे झाले. एल्फिन्स्टनने वर्णन करताना त्याच्या जर्नलमध्ये हे लिहिले आहे:

"... The Europeans talked of surrendering. The native officers behaved very ill and the men latterly could scarce be got even by kicks and blows to form small parties to defend themselves. They were under thirst fatigue and despondency...."

("... युरोपिअन (सैनिक आणि अधिकारी) शरण जायची भाषा बोलत होते. नेटीव्ह ऑफिसर्स (भारतीय अधिकारी) अजिबात नीट वागत नव्हते (म्हणजे ऑर्डर्स न ऐकणे वगैरे) अन्नाचा इतका तुटवडा झाला होता की गोष्टी छोट्या छोट्या टोळ्या बनवून लाथा बुक्क्यांवर आलेल्या होत्या. तहान (भूक) आणि आलेला थकवा ह्याने ते खचून गेलेले होते...")

ह्या जर्नल्समध्ये स्वतः एल्फिन्स्टन स्पष्ट लिहितोय की पेशव्याच्या  'विजयी' सैन्याशी सामना होईल अशी अटकळ होती किंवा स्मिथ येत आहे ह्या बातमीमुळे निघून गेलेल्या पेशव्यामुळे सैनिक जिवंत वाचलेत. किंवा स्टॉन्टनला भेटल्यानंतरच्या वर्णनात त्याच्या सैन्याच्या दारुण अवस्थेचीही कल्पना येते. मग इंग्रजांचा विजय झाला होता असा अपप्रचार कोणत्या जोरावर केला जातोय?

आणि तसे पाहता इंग्रजांनी मराठ्यांच्या फौजांचे येरवडा, खडकी, आणि अष्टी येथे दणदणीत पराभव केलेले होते. अष्टीच्या लढाईत प्रत्यक्ष बापू गोखले मारले गेलेले होते. मग ह्या सगळ्यापैकी कुठेही कोणताही 'विजयस्तंभ' न उभारता तो स्तंभ नेमका कोरेगावात उभारायची शिफारस कशी काय बरं केली असावी एल्फिन्स्टनने? नक्की काय लिहिले त्याने बंगालमध्यें गव्हर्नर जनरलच्या समितीला? किती खर्च आला होता हा स्तंभ बांधायला? काय होते त्याचे डिटेल्स?
इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ५
-------------------------------------------

मागच्या भागात आपण पाहिले की स्वतः एल्फिन्स्टनने त्याच्या जर्नलमध्ये लिहून ठेवलेले आहे की त्याला पेशव्याच्या 'विजयी' सैन्याशी सामना होईल अशी अटकळ होती किंवा स्मिथ येत आहे ह्या बातमीमुळे निघून गेलेल्या पेशव्यामुळे स्टॉन्टनचे सैनिक जिवंत वाचलेत. किंवा पुढे स्टॉन्टनला भेटल्यानंतरच्या त्याच्या जर्नलमधल्या वर्णनात  कोरेगावमध्ये स्टॉन्टनच्या सैन्याच्या झालेल्या दारुण अवस्थेचीही कल्पना येते.

स्टॉन्टन हा सैन्यात फक्त एक साधा कॅप्टन होता. कोणी मोठा अधिकारी - म्हणजे कर्नल अथवा ब्रिगेडिअर - वगैरे नव्हता. तरीही त्याने त्याचे थोडेसे सैन्य वापरून अतिशय विपरीत परिस्थितीत आणि अन्नपाण्याशिवाय मराठ्यांच्या मोठ्या सैन्याशी लढायची तडफ दाखवलेली होती. कोरेगावात वेढ्यात अडकलेला असतानाही प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्याने शरणागती पत्करली नाही किंवा कोणतीही लूट होऊ दिली नाही. इंग्रजांच्या दृष्टीने ही फार महत्वाची घटना होती. ह्याबद्दल स्टॉन्टनचेही चहूबाजूंनी कौतुक झाले. स्टॉन्टनला एक खास तलवार आणि ५०० सोन्याच्या गिनी (नाणी) बक्षीस देण्यात आली. त्याला मेजर म्हणून बढतीही दिली गेली.

२६ जून १८१८ रोजी एल्फिन्स्टनने कलकत्त्याला गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलला एक खास पत्र पाठवून कोरेगावच्या युद्धात कामी आलेल्या आणि जखमी झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ कोरेगावातच स्मारक बांधायची परवानगी मागितली होती. १९ सप्टेंबर १८१८ रोजी गव्हर्नर जनरलच्या सचिवाकडून त्याला परवानगीचे पत्र पाठवण्यात आले. एल्फिन्स्टनला ह्या स्मारकाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यासाठी सांगण्यात आले. त्याला अशीही सूचना आली की ह्या स्मारकावर कोरेगावच्या लढाईत कामी आलेल्या सगळ्या सैनिकांची नावे इंग्रजीत, फारसीत, आणि मराठीत लिहिलेली असावीत.

१३ नोव्हेंबर १८१९ रोजी मुंबईच्या गव्हर्नरतर्फे कोरेगावात लढलेल्या सगळ्या सैनिकांना खास बक्षीस म्हणून ५ वर्षांची सिनियॉरिटी देण्यात आली - जेणेकरून सगळ्यांचे पेन्शन रिटायरमेंटच्या ५ वर्षे आधी सुरु होईल (आणि ते तोपर्यंत इंग्रजी सैन्यामधूनच लढतील. हे पहा आजकालच्या कॉर्पोरेट संस्कृतीमधल्या व्हेस्टेड बोनसचे २०० वर्षांपूर्वीचे उदाहरण!) . पुढे १५ जानेवारी १८२० रोजी बंगालच्या गव्हर्नर जनरलच्या समितीकडून कोरेगावातल्या स्तंभाच्या बांधकामाच्या ३ निविदांपैकी १ निविदा पास झाली. एकूण खर्च ३४१५१ रुपये अपेक्षित होता आणि तेवढ्याच खर्चात हे स्मारक बनले. ह्या निविदेमध्येही स्पष्ट उल्लेख आहे की हा स्तंभ त्या शूर सैनिकांच्या स्मरणार्थ आहे जे १ जानेवारी १८१८ च्या युद्धात मारले गेले. ("...to commemorate the heroic example of officers and men who fell at that village on the 1st January 1818...") येथेही कुठेही कोणत्याही 'विजया'चा उल्लेख नाही.

पुढील दोन वर्षात हा स्तंभ बांधून पूर्ण झाला. १३ डिसेंबर १८२४ रोजी मुंबई सरकारकडून कोरेगावच्या स्तंभाची देखभाल करण्यासाठी ट्रस्ट बनवले गेले. कोरेगावच्या लढाईत हवालदार म्हणून लढताना अपंगत्व आलेल्या खंडूजी मुळोजी नावाच्या व्यक्तीची तेथे देखरेखीसाठी नेमणूक झाली. त्याला जमादाराची पदोन्नती देण्यात आली. स्तंभाजवळ एक जमीनीचा छोटासा तुकडाही त्याला घर बांधण्यासाठी सरकारकडून देण्यात आला. हे काम त्याला वंशपरंपरागत सांगितले गेले. त्याच्या घराण्यात पुढे वारस नसल्यास सरकारचा निर्णय अंतिम राहील असेही कलम टाकण्यात आले.

ह्या सगळ्या कागदपत्रांवरून सरळ दिसतंय की हा स्तंभ कोणताही विजय साजरा करण्यासाठी नसून फक्त ह्या लढाईत मारल्या गेलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आला होता जे अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये अडकलेले होते. इथपर्यंत तर सगळं ठीक होतं पण धूर्त एल्फिन्स्टनने ह्या सगळ्यात एक अतिशय महत्त्वाची गडबड करून - दुहीची बीजं पेरून ठेवली होती - ज्याची फळं आपण आजही पाहतोय. त्याने असं नक्की काय केलं - पाहूयात पुढच्या भागात!

संदर्भ

ब्रिटिश लायब्ररी (IOR/F/4/719/19545 : Jun 1818-Jan 1820)

'Sketch of the column at Corygaum, with a plan of the village, some letters private and public, the general orders and the despatch relating to the action on the 1st January, 1818' - by John Wylie [1839]

British Library Shelf-mark: 10057.pp.10
इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ६

-------------------------------------------

मागच्या भागात आपण पाहिले हा स्तंभ कोणताही प्रचंड विजय साजरा करण्यासाठी नसून या लढाईत शूरतेने लढलेल्या आणि मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आला होता जे अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये अडकलेले होते आणि तरीही त्यांनी शत्रुसैन्याशीं निकराचा सामना केला. पण धूर्त एल्फिन्स्टनने ह्या सगळ्यात एक अतिशय महत्त्वाची गडबड करून दुहीची बीजं पेरून ठेवली होती. त्याने नक्की काय केलं होतं हे पाहूयात आज आणि उद्याच्या भागांत.

१९ सप्टेंबर १८१८ रोजी गव्हर्नर जनरलच्या सचिवाकडून एल्फिन्स्टनला सूचना आली होती की ह्या स्मारकावर कोरेगावच्या लढाईत जखमी झालेल्या आणि कामी आलेल्या सगळ्या सैनिकांची नावे इंग्रजीत, फारसीत, आणि मराठीत लिहिलेली असावीत. नंतर फारसीची मागणी वगळण्यात आली कारण जरी कलकत्त्यात फारसीचा वापर होत असला तरी महाराष्ट्रात फारसा वापर होत नव्हता. त्यामुळे ह्या स्तंभावर फक्त इंग्रजीत आणि मराठीत लेख आणि नावे असावीत ही सूचना मान्य केली गेली.

ह्या पोस्टसोबत कोरेगावच्या स्मारकाच्या इंग्रजी लेखाचा फोटो जोडला आहे. जिज्ञासूंनी तो नक्की पाहावा. त्याचे मराठी भाषांतर साधारणपणे असे होते:

“मुंबईकडील शिपायांच्या तुकडीचे नेतृत्व करणार्‍या कॅप्टन स्टाँटन यांच्यतर्फे हा स्तंभ कोरेगावच्या रक्षणाचे स्मारक म्हणून उभारण्यात आला आहे, जे १ जानेवारी १८१८ रोजी पेशव्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्वोत्तम आणि रक्तपिपासू अशा संपूर्ण लष्कराकडून घेरले गेले होते. कॅप्टन स्टाँटन – अतिशय धक्कादायक परिस्थिती, असाध्य विरोध आणि अजिंक्य मनोवृत्तीच्या शिपायांचे अनुमोदन, आणि शत्रूकडील अस्वस्थता यांमूळे पूर्वेकडील ब्रिटीश सैन्याने अभिमानास्पद सफलता प्राप्त केली. या शूर सैन्याची आठवण चिरस्थायी करण्यासाठी हा त्यांच्या खंबीरपणाचा गौरव आहे. इंग्रज सरकारने त्यांच्या शिपायांची आणि मारल्या गेलेल्या इतरांची, तसेच जखमी झालेल्यांची नावे सदर स्मारकावर लिहीण्याचे निर्देश दिले आहेत”. याखाली “सीम्प्सन अ‍ॅँड कर्नल लेवलीन Setrs, कलकत्ता” असे लिहीले आहे.

स्मारकावर जखमी झालेल्या आणि मारल्या गेलेल्या सैनिकांची त्यांच्या युनिटनुसार नावे आहेत. ह्या युनिटमध्ये मद्रास आर्टिलरी (तोफखाना), बॉम्बे नेटिव्ह इन्फन्टरीच्या पहिल्या रेजिमेंटची दुसरी बटालियन (पायदळ), आणि  पूना ऑक्सिलरी हॉर्स (घोडदळ) ह्या तीन युनिट्सची नावे आहेत. जातीवाचक कोणत्याही युनिटचे नाव नाही हे ध्यानात घ्यावे.

स्मारकावर जखमींची फक्त १५ नावे आहेत. पण ह्या लढाईत १०८ लोक जखमी झाले होते ज्यांची नावे स्मारकावर नाहीत. कोण्या एका जातीच्या सैनिकांनी विशेष पराक्रम केला अशी कोणतीही नोंद इंग्रजी कागदपत्रात नाही. एका रजिस्टरमध्ये ह्या सगळ्या सैनिकांची नावे, त्यांचे युनिट, पद, कंपनी, हॉस्पिटलमधून डिस्चार्जची तारीख, जर उपचारादरम्यान मृत्यू आला असेल तर किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये बदली झाली असेल तर तशी नोंद आहे. ह्याचबरोबर प्रत्येकाला शरीरावर नेमक्या कोणत्या आणि कुठे जखमा झाल्या होत्या ह्याचीही नोंद आहे. जिज्ञासूंनी ही यादी नक्की पाहावी. ह्यातही कुठेही जातवार नावे नाहीत ही पुन्हा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.

पण शेवटचा मुद्दा राहतोच. स्मारकाच्या इंग्रजी लेखात Triumph असा शब्द कोरला आहे, आणि या शब्दाचे अनेक अर्थ निघतात. इंग्रजांनी भारतात, इथल्या लोकांकरिता 'विजय, जय' असा शब्द जोडून हा स्तंभ उभारला. पण एक गोष्ट नजरेसमोर आणली तर या लढाईपूर्वी झालेल्या खडकीच्या आणि येरवड्याच्या लढाईतही इंग्रजांचा विजय झालेला. यानंतरही, गोपाळ-आष्टीच्या लढाईत खुद्द पेशव्याचे सेनापती बापू गोखले मारले गेल्यानंतर व ती लढाई पेशव्याच्या हातून इंग्रजांनी जिंकून घेतल्यानंतर तर वास्तविक मोठा विजय इंग्रजांनी साजरा करायला हवा होता. या सगळ्या गोष्टी विचारात घेता, इंग्रजांची उघड वागण्याची पद्धती आणि त्यांची अंतर्गत पत्रव्यवहाराची नीती नेमकी कशी होती? पाहूया उद्याच्या भागात!
इंग्रजांचं 'भीमा-कोरेगाव': भाग ७

-------------------------------------------

मागच्या भागात आपण पाहिले की लढाईत जखमी झालेल्या किंवा मारल्या गेलेल्या लोकांमध्ये कोण्त्याही प्रकारची जातवार विभागणी नाही. त्या यादीत सगळ्या जाती आणि धर्मांचे लोक आहेत. कोणत्याही इंग्रजी कागदपत्रात - लढाईच्या किंवा अगदी कोरेगावचे स्मारक बनवायच्या - कुठेही 'विजय' अथवा 'जय' असा उल्लेख नाही. पण कोरेगाव येथे उभारलेल्या स्मारकावर मात्र जयस्तंभ असा उल्लेख मात्र दिसतो ही तफावत कशी काय? स्मारकावर लिहिलेल्या Triumph अथवा 'जय' ह्याचे अजून दाखले कुठे मिळतात का? का फक्त भारतीयांच्या डोळ्यात धूळफेक करायला हे शब्द वापरले गेलेत? पाहूया ह्या आजच्या आणि शेवटच्या भागात.

इंग्रजांच्या दृष्टीने पाहता स्टॉन्टन हा सैन्यात फक्त एक साधा कॅप्टन होता. कोणी लेफ्टनंट अथवा कर्नल वगैरे उच्चपदस्थ अधिकारी नव्हता. तरीही त्याने तुलनेने कमी संख्याबळ असलेले सैन्य वापरून अतिशय विपरीत परिस्थितीत आणि अन्नपाण्याशिवाय मराठ्यांच्या मोठ्या सैन्याशी लढायची तडफ दाखवलेली होती. कोरेगावात वेढ्यात अडकलेला असतानाही प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्याने शरणागती पत्करली नाही किंवा कोणतीही लूट होऊ दिली नाही. त्याची अशीही अटकळ असावी की हे वेढा दिलेला असतानाच बाहेरून मदत येऊन पेशवे आणि सातारकर प्रतापसिंह छत्रपती इंग्रजी सैन्याकडून पराभूत होऊन पकडले जावेत. बाकीचे युरोपिअन अधिकारी शरणागती पत्करायला सांगत असताना आणि नेटिव्ह सैनिक धड वागत नसतानाही स्टॉन्टनने जो बाणेदारपणा दाखवला तो खरंच वाखाणण्यासारखा होता - पण तो विजय खचितच नव्हता. स्टाँटनचा जर इंग्रजांच्या म्हणण्याप्रमाणे विजय झाला असता तर तो हात हलवत शिरूरला का परतला ? तो ना बरच्या मदतीला गेला ना सातारकर छत्रपती आणि पेशव्यांच्या पाठलागावर गेला.

इंग्रजी कागदांप्रमाणेच आपल्याकडच्या काही कागदांतही या लढाईचे काही उल्लेख सापडतात. मराठी कागदपत्रात ह्या लढाईचे काय वर्णन आले आहे ते थोडक्यात पाहूया. माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टनच्या डायरीप्रमाणेच आपल्याकडील कागदांतही मराठी सैन्याने बिनधास्त गावात शिरून दीड पलटण कापून काढली असं म्हटलं आहे. दि. ४ जानेवारी १८१८ ची तीन निरनिराळी बातमीपत्रे ‘पेशवे दफ्तर खंड ४१' मध्ये लेखांक १७५-१७६-१७७ म्हणून प्रसिद्ध झाली आहेत. या बातमीपत्रांमधील मजकूर असा - “गुरुवारी कूच होऊन फुलगावापुढे तीन कोश कोरेगाव आहे तेथे फौजा गेल्या, तो इंग्रजांकडील दीड पलटण व तोफा आल्या. नंतर त्यांणी तोफ डागली. तेव्हा सरकारफौजेने चालून घेतले. त्यांनी कोरेगावच्या आश्रा घेतला. ते गावात सिरले. नंतर गोखले रस्ते वगैरे पायउतारा होऊन पारपत्य केले. फौजही बेलासिक (बेलाशक=बिनधास्त) गावात सिरून दीड पलटण व तीनशे तुरूप स्वार कापून काढिले. त्यात जो खासा होता त्याचे डोसके मारिले”.  ह्याचप्रमाणे "पेशवाईच्या अखेरची खबर" म्हणून एका साधनात असलेला उल्लेख असा- “दशमीस वर्तमान उठले की कोरेगावच्या मुक्कामी दोन पलटणे घोडनदीकडील येत होती त्याची बातमी लष्करात कळली व त्याचे दुमदारीवर पुरंधरे वगैरे फौज होती ती व स्वारीतील फौजही त्याचे अंगावर जाऊन लढाई मोठी झाली. एक पलटण मारिले”. हा कागद म्हणजे तर अक्षरशः त्रयस्थ माणसाने केलेले वर्णन आहे, तुपामुळे मराठ्यांनी स्वतःचंच केलेलं कौतुक वगैरे सुद्धा म्हणायला कोणाला सोया नाही. आणखी एक समकालीन कागद, १७३८ शकातील हकीकतीतही “कोरेगावाजवळ येताच श्रीमंतांकडे फौजेने पाहून सारी फौज तयार होऊन त्याजवर गेली. ते गावात शिरले आणि लुटू लागले. त्यांनी मारगिरी फार केली पण श्रीमंतांचे लष्कर मोठे असल्याने इलाज चालला नाही” अशी नोंद सापडते. म्हणजे आपल्या मराठी कागदपत्रात आलेली आणि इंग्रजी कागपत्रात आलेली वर्णने ताडून पहिली असता तंतोतंत जुळतात.

असेही काही प्रतिवाद आम्ही वाचलेत की ज्याप्रमाणे शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभूंनी खिंड लढवली त्याप्रमाणे स्टॉन्टनने आधी ठरवलेल्या योजनेनुसार त्याच्या सैनिकांसह पेशवा आणि सातारकर छत्रपतींना अडकवून ठेवले. ह्या प्रतिवादातही काहीच तथ्य नाही कारण तसे असते तर स्टॉन्टनने कर्नल स्मिथला त्याच्या सैन्याला कोरेगावात वाचवायच्याबद्दल पत्र पाठवले नसते. ह्यापुढे जाऊन ब्रिटिश लायब्ररीत मुंबईच्या गव्हर्नरची - सर इव्हान नेपिअनची पत्रे उपलब्ध आहेत ज्यात २ जानेवारी १८१८ रोजी त्याला आलेल्या पत्रात लिहिले आहे की: "As I am concious my letter of this morning must have excited the greatest anxiety in your quarter, I lose no time in informing you, that notwithstanding our effort to assist their junction proved abortive, they are thank god relieved from a portion of their sufferings by the departure of the Peishwa's Army which has proceeded further down the Beemah...", म्हणजे "मला कल्पना आहे की ह्या सकाळी मी पाठवलेल्या पत्रामुळे (कोरेगावच्या वर्णनामुळे) तुम्ही चिंतीत झाला असाल, म्हणून मी लगोलग तुम्हाला कळवतोय की जरी आपले त्यांना मदत पाठवायचे प्रयत्न विफल झाले असले तरी देवाच्या कृपेने पेशव्याचे सैन्य भीमेच्या दक्षिणेला निघून गेल्याने त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेतून त्यांची सुटका झाली आहे..." - म्हणजे कोरेगावात पेशवे आणि छत्रपतींना अडकवून ठेवायचा स्टॉन्टनचा प्लॅन वगैरे होता ही शक्यता उरतच नाही.

कोरेगावात इंग्रजी सैन्याचा विजय झाला की नाही ह्याबद्दल आता आपण एक शेवटचा पण अतिशय महत्त्वाचा पुरावा पाहणार आहोत. हा पुरावा आहे प्रत्यक्ष ब्रिटिश पार्लमेंटच्या दप्तरांमध्ये. ब्रिटिश पार्लमेंटचे १८०३ पासूनचे सगळे संसदीय कामकाज ह्या हॅन्सार्ड मध्ये जपून ठेवलेले असते. ब्रिटिश संसदेत - हाऊस ऑफ कॉमन्समध्ये -  स्टॉन्टनच्या सैन्याबद्दल चर्चा झाली होती - ती येथे देतोय. ४ मार्च १८१९ रोजी कॅनिंगने हेस्टिंग्ज आणि त्याच्या भारतीय सैन्याचे आभार मानताना कोरेगावच्या लढाईबद्दल काढलेले हे उदगार आहेत. खाली लिंक आहे - जिज्ञासू स्वतः वाचून खात्री करू शकतात:

"...was on its march from a distant part of the Peishwah's territories to Poonah, soon after the denunciation of hostilities; and unexpectedly found itself in presence of the whole Mahratta army. What was the exact amount of the Peishwah's force I am not able to state with precision, but the cavalry alone was not less than 20,000. The small band which I have described, hemmed in on all sides by this over-whelming superiority of numbers, maintained through a long day an obstinate and victorious resistance: victorious—for they repelled on every point the furious attacks of the enemy. The chief suffering of which they complained during this singular and most unequal contest, was the intolerable thirst which they could not procure the means of slaking until the action was over. In the end they not only secured an unmolested retreat, but they carried off their wounded!..."

म्हणजे "... (शिपायांची एक तुकडी) पुण्याजवळच्या पेशव्याच्या भागातून जात असताना अचानकपणे मराठा सैन्याच्या सामोरी आली. पेशव्याकडे घोडदळाच २०००० होते. हे छोटीशी तुकडी सर्व बाजूंनी ह्या भरपूर सैन्याने वेढली गेली  तरीही त्यांनी एक संपूर्ण दिवस (त्या मोठ्या सैन्याचा) चिवट आणि सफलपाने विरोध केला - सफल ह्यासाठी कारण त्यांनी शत्रूचा हल्ला प्रत्येक ठिकाणी परतवून लावला. ह्या असमान लढाईत त्यांना सगळ्यात जास्त त्रास कशाचा झाला असेल तर तो तहानेचा - लढाई संपेपर्यंत त्यांना प्यायला पाणी मिळाले नाही. पण शेवटी त्यांनी यशस्वी माघार घेतली आणि जखमींनाही बरोबर नेले..."

प्रत्यक्ष संसदीय कामकाजातल्या वर्णनात ही 'सफलता' कसली होती हे नीट सांगितलंय कॅनिंगने. कोरेगावच्या स्मारकावर लिहिलेला 'Triumph' वगैरे शब्द कुठेही बाकीच्या कागदपत्रात - अगदी ब्रिटिश संसदेतल्याही - नाही हेच ह्यावरून सिद्ध होते.

इंग्रजांनी जेव्हा पेशव्यांना बंडखोर ठरवले आणि राज्य घेतले तेव्हा इथल्या लोकांच्या मनातून ‘पेशव्यांची’ प्रतिमा जोवर मलिन होत नाही तोवर आपल्याला सुरळीत राज्य करता येणार नाही हे इंग्रजांना पक्के समजून चूकले होते. बंडखोर ठरवूनही आणि पेशवे पदावरून दूर करवूनही बाजीराव चार महिने इंग्रजांशी लढत होते आणि माल्कम त्यांच्या पाठलागावर जंगल तुडवत होता यातच इंग्रजांना पेशव्यांची किती धास्ती होती हे समजून येते. म्हणूनच, ३ जून १८१८ ला बाजीरावांकडून शरणागती लिहून घेतल्यावर माल्कमने त्यांना शक्य तितके महाराष्ट्रापासून दूर ठेवले, जेणेकरून इथे राहून पुन्हा उठाव होऊ नयेत. यासोबतच इथल्या माणसांच्या मनात पेशव्यांविषयी विष पेरले. एल्फिन्स्टनच्या मनातील विचार इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे यांनी "महाराष्ट्रेतिहासाची साधने" या त्यांच्या ग्रंथात नमूद करून ठेवले आहेत, ते वाचण्याजोगे आहेत. त्यातून या महत्वाकांक्षी माणसाच्या मनात काय राजकारणे घोळत होती याचा अंदाज येईल. तो इथला विषय नसल्याने त्याविषयी लिहिणे सध्या बाजूला ठेऊ.

इंग्रजांनी पसरवलेल्या या विषवल्लीचा परीणाम मात्र ब्राह्मण आणि बहुजन या दोघांवरही इतका झाला की एकेकाळी एकमेकांच्या साथीने, विचाराने काम करणारे, लढणारे हे दोन समूह एकमेकांचा न भूतो न भविष्यती दुस्वास करू लागले. यात दोन्हीही समाजांचे आजवर नुकसानच झाले. पण इंग्रजी राज्य जाऊन, आज इतकी ऐतिहासिक साधने उपलब्ध असतानाही या दोन्हीही समाजांना हे समजू नये का ? किमान आतातरी हे सगळे गैरसमज दूर करून ही जातियता संपेल अशी अपेक्षा करावी काय ? दुर्दैवाने आपण अजूनही परकीयांच्याच बोलण्यावर-लिहिण्यावर विश्वास ठेवत आपल्याच लोकांवर सूड उगवत आहोत. जेव्हा हे सगळं संपेल आणि पूर्वीप्रमाणेच जातीय सलोखा प्रस्थापित होईल तो सुदिन!

संदर्भ:

'Sketch of the column at Corygaum, with a plan of the village, some letters private and public, the general orders and the despatch relating to the action on the 1st January, 1818' - by John Wylie [1839]
British Library Shelf-mark: 10057.pp.10

सर इव्हान नेपिअन पेपर्स (ब्रिटिश लायब्ररी कॅटलॉग Mss Eur D666: 1812-1820)

http://hansard.millbanksystems.com/commons/1819/mar/04/vote-of-thanks-to-the-marquis-of#column_880

सर्वांसाठी अत्यंत महत्वाची सूचना:

आधीच हा विषय मुद्दाम जातीय बनवला गेल्याने संवेदनशील बनलेला आहे. आणि तीच चुकीची मानसिकता बदलण्यासाठी आपण हे करत आहोत. चुकूनही कोणी एकही जातीय कमेंट करु नये. हा लढा सरळ सरळ मराठे विरुद्ध इंग्रज असाच होता. यात कुठल्याही जातीचा संबध नाही. इंग्रजांच्या कूटनीती उघड पडण्याचा हा प्रयत्न असून आपल्याच माणसांविषयी अपमानास्पद लिहिण्याचा नाही हे लक्षात घ्यावे.

1 comment:

  1. हे इतक स्पष्ट असताना मराठी वृत्तपत्रे व चॅनल या बद्दल हे सत्य का सांगत नाहित.
    28 हजार कापले या बद्दल कायदेशीर कारवाई करता येईल का?

    ReplyDelete