Saturday 6 August 2016

Medicine purchase precautions

Purchase of medicines
Writer  वसुंधरा देवधर
(लेखिका मुंबई ग्राहक पंचायतीत शिक्षण विभागाच्या प्रमुख आहेत.)

औषधांच्या दुकानात आपल्याला जावंच लागतं. आपल्या देशात अनेक औषधांच्या दुकानांमध्ये आइस्क्रीमपासून जीवरक्षक औषधांपर्यंत खूप साऱ्या गोष्टी मिळतात. त्याचे नावच अनेकदा ‘मेडिकल आणि जनरल स्टोअर्स’ असं असतं. पण एक ग्राहक म्हणून आपल्याला हे माहीतच असायला हवं की सामान्य दुकानांमध्ये आणि मेडिकल स्टोअरमध्ये फरक असतो. या फरकाचं भान दुकानदारांपासून ग्राहकांपर्यंत सर्वांनाच असायला हवं. 

मेडिकल म्हणजे औषध विक्रीचा व्यवसाय करण्याचा परवाना. तो असा कोणालाही मिळत नाही. त्यासाठी फार्मसी म्हणजे औषधनिर्माणशास्त्रातील निदान पदविका तरी असावी लागते. ही पात्रता असेल त्याच व्यक्तीला औषधं विकता येतात. इतकंच नव्हे, तर मेडिकल स्टोअरमध्ये ते सकाळी उघडल्यापासून रात्री बंद करेपर्यंत फार्मासिस्ट हजर असलाच पाहिजे, असा नियम आहे. याचं मुख्य कारण असं की सर्वसामान्य ग्राहकाला/ रुग्णाला/त्याच्या नातेवाइकाला औषध खरेदी करताना काही शंका असेल, ते कसं घ्यावं याबाबत जर अडचण आली तर तिचं निवारण फार्मासिस्टनं करणं अपेक्षित असतं. औषधांची नावं, त्यावरील माहिती, ते कसं द्यावं, कधी घ्यावं/ घेऊ नये याबाबतची माहिती ग्राहकाला समजेल अशा भाषेत सांगणं, ही फार्मासिस्टची जबाबदारी असते. मात्र आपण अशी माहिती औषधाच्या दुकानात विचारू शकतो, हेच अनेक ग्राहकांना माहीत नसतं. ज्यांना हे माहीत आहे, त्यापैकी कुणी ‘इथे फार्मासिस्ट कोण आहे?’ असा प्रश्न केल्याक्षणी सर्वसामान्यपणे तीव्र प्रतिक्रिया येते. त्यामध्ये ‘तुम्ही कोण?’ ‘कशाला हवाय फार्मासिस्ट’, ‘जेवायला गेलाय/चहाला गेलाय,’ ‘औषध मिळालं ना?’ अशी अनेक उत्तरं ऐकायला येतात. ‘फार्मासिस्ट मी आहे’, असं उत्तर क्वचितच एखाद्याला मिळतं!

फार्मासिस्टची सेवा मेडिकल स्टोअरमध्ये असायलाच हवी, याबाबत ग्राहक आग्रही सोडा, जागरूकही नाहीयेत. आपण जी औषधे खरेदी करतोय त्यांच्या किमतीत या सेवेचं मूल्य अंतर्भूत आहे, हे पण ग्राहकांना माहीत नसतं. म्हणजे वर्षानुवर्षे ग्राहक या सेवेचं मूल्य देतोय पण सेवा मागत नाही. ती द्यायला आपण बांधील आहोत, याची जाणीवही मेडिकल स्टोअरच्या चालकांना नाही.

यासंदर्भात जाणीव करून देण्याचा प्रयत्न ऋऊअ तर्फे झाला तो २०१३ मध्ये. त्यावेळी १७ ते २५ जूनदरम्यान औषध विक्री व्यावसायिकांनी तमाम ग्राहक जगताला, पर्यायानं रुग्णांना वेठीला धरण्याचा प्रयत्न केला. अखंडपणे घ्यावी लागणारी औषधं हळूहळू बाजारातून दिसेनाशी होऊ लागली होती व अखेर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हस्तक्षेप करावा लागला होता. याची आठवण करून देण्याचं कारण एवढंच की, औषध खरेदीबाबत ग्राहक म्हणून आपले जे हक्क आहेत ते आपण कधीच न बजावल्यानं किंवा आपणास माहीत नसल्यानं त्यावेळी विक्रेता संघ अधिकाधिक आक्रमक होऊ शकला. शिवाय याबाबतीतला हलगर्जीपणा केल्यास तो रुग्णाला किती त्रासदायक व सर्वार्थानं महाग पडू शकतो, याविषयी गांभीर्याने विचार व्हायला हवाय, याचीही जाणीव दिसत नाही. 

अशा परिस्थितीत ग्राहकांनीच थोडं जागरूक असायला हवं. ग्राहकांची जागरूकताच औषध विक्रीच्या क्षेत्रातला बेजबाबदारपणा दूर करणारं मुख्य औषध आहे. 

औषधं खरेदी करताना  असं होतं का?

१) डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनपेक्षा वेगळं, पण तसंच (असं दुकानदारानं सांगितलं म्हणून!) औषध आपण विना तक्रार घेतो.

२) आपण बिलाचा आग्रह धरीत नाही. एखाद्या ग्राहकानं बिल मागितल्यास दुकानदार ताटकळत उभे ठेवतो.

३) जुन्या प्रिस्क्रिप्शनवर औषधं विकणं चुकीचं आहेच, तरी दुकानदार देतात. आपण ग्राहकही तसे करण्यास दुकानदाराला भाग पाडतो आणि त्यामुळे चुकीची प्रथा चालू ठेवतो.

४) औषध घेताना एक्सस्पायरी डेट बघावी. दुकानदारानं दिलेलं औषध प्रिस्क्रिप्शननुसारच आहे ना याची खातरजमा करावी. ते आपण करतो का?

५) पॅकिंग व्यवस्थित आहे ना, ते खराब झालेलं नाही ना, हेही तपासून घ्यावं.

६) तीव्र परिणाम करणारी औषधं स्टिरॉईड्स इ. प्रिस्क्रिप्शनशिवाय मागणं, आपण स्वत:च विकत घेणं हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं याची पुरेशी जाणीव ग्राहकांना असायलाच हवी. 

७) आरोग्य सेवा व औषधांच्या किमती वाढत असल्यानं डॉक्टरांकडे न जाता औषधाच्या दुकानात जाऊन त्यांना आपला आजार सांगून औषधाच्या दुकानातून थेट औषधे घेणं असं घडू शकतं, घडत आहे, पण हे चुकीचं आहे.

८) जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटल्यानुसार जगभरातील एकूण औषध व्यवहारांपैकी ५० टक्के म्हणजे निम्मी औषधं योग्य प्रकारे वापरली जात नाहीत. औषधं हे इतक्या सहजपणे घेण्यासारखी गोष्ट नाही. म्हणून ग्राहकांनी औषध खरेदी करताना स्वत: जागरूक राहावं. चुकीच्या प्रथांना प्रोत्साहन देऊ नये.

 

No comments:

Post a Comment