Wednesday, 3 September 2025

कैलास यात्रा

कैलास मानसरोवर यात्रा 
१२ ॲागस्ट २०२५-२५ ॲागस्ट २०२५
(काठमांडू मधील स्वागत)

आधी कोविड नंतर चायनाने गलवानमध्ये केलेली घुसखोरी आणि वीर भारतीय जवानांनी परत मिळवलेला ताबा. त्यामुळे गेली पाच वर्षे पेक्षा जास्त काळ कैलास आणि मानसरोवर यात्रा स्थगित होती. 
श्री नरेंद्र मोदी आणि श्री शी जिनपिंग यांच्यात रशिया मध्ये ब्रिक्स समिट मध्ये ऑक्टोबर २०२४ मध्ये झालेल्या चर्चेत कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करणे बाबत चर्चा झाली आणि त्याच्या बाबत अधिकृत निर्णय चायना सरकारने घोषित करणेची सर्व हिंदू लोक वाट पाहात होते. 
(बस मधे बसण्यासाठी जाताना)

कित्येक मोठ्या मोठ्या टूर कंपनीने तर अशी अजून लेखी परवानगी मिळालेली नसताना देखील पेपर मध्ये, ऑनलाईन जाहिराती देऊन लोकांकडून पैसे जमा करायला सुरुवात देखील केली.
(काठमांडू हॉटेल मधील ब्रीफिंग मीटिंग) 

लोकांच्या प्रचंड उत्साहामुळे लगेचच या टूर कंपनीनी बुकिंग फुल्ल होत आहे असे जाहीर पण केले. 
या यात्रेस जाण्याचे मी, श्री सुनभ परुळकर आणि सौ भाग्यश्री पडसलगीकर यांनी ठरवले होते त्यामुळे इकडे तिकडे चौकशी करून आम्ही ट्रेकर श्री केदार गोगटे यांच्या कडे चौकशी केली की आपण कैलास मान सरोवर यात्रा  साठी लोकांना घेऊन जाणार आहात तर आम्हाला यायचे आहे. परंतु श्री केदार गोगटे यांनी सांगितले की अजून चायना गवर्नमेंट कडून अधिकृत परवानगी मिळालेली नाही त्यामुळे ते बुकिंग स्वीकार करू शकत नाही परंतु आमचे नाव त्यांनी यादी केली त्यात समाविष्ट करू असे सांगितले. त्याप्रमाणे २४ मार्च २०२५ रोजी आम्ही तिन्ही नावे श्री कैलास गोगटे यांच्याकडे व्हॉट्सॲप द्वारे दिली. 
आम्ही परवानगीची वाट पाहात बसलो कारण असे स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे त्यामुळे इतर यात्रा कंपनी पेक्षा यांच्याबरोबरच जायचे हे मनाने ठरवले. 
श्री केदार गोगटे यांना चौकशी साठी फोन केला तर ते नेहमी कुठे तरी ट्रेक करायला गेलेले असायचे त्यामुळे फोन लागायचा नाही त्यामुळें मन थोडे दोलायमान होत होते. २४ मार्च पासून २ मे पर्यंत बऱ्याच वेळेला श्री केदार गोगटे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ दर वेळेला फोन पोचत नव्हता कारण केदार ट्रेक मध्ये असायचे. 
(काठमांडू मधील विष्णू मंदिर)

त्यानंतर मी दिल्ली येथे असताना भाग्यश्रीचा निरोप आला की श्री केदारने आता ८४७५० रुपये ऑनलाईन भरायला सांगितले आहे आणि २४ जुलै २०२५ रोजी आपल्याला काठमांडू लाजावे लागेल. तसेच केदार यांनी पण मेसेज पाठवला की आता चायना सरकारने परवानगी दिलेली आहे तेव्हा पैसे भरा. 
(काठमांडू मधील ABC चे श्री ईश्वर)

मी ३ मे २०२५ रोजी ऑनलाईन ८४७५० रुपये भरून टाकले आणि भाग्यश्रीला पण भरायला सांगितले. श्री सुनभ परुळकर यांना यावेळी येणे शक्य नव्हते कारण त्यांनी दुसऱ्या देशात जाण्यासाठी आधीच बुकिंग केले होते. 
(पुणे विमान तळावरील पहिली भेट)

आम्ही आता आठवड्यातून एकदा म्हणजे मंगळवारी सकाळी पाच वाजता सिंह गड वर जायची प्रॅक्टिस सुरू केली. भाग्यश्री ने आधीच ही प्रॅक्टिस सुरू केली होती आणि श्री निरंजन देशपांडे जे कैलासला आमच्या ग्रूप बरोबर येणार होते ते देखील मंगळवारी सिंहगड वर जात होते. 
बऱ्याच दिवसांनी सिंहगड वर गेल्या मुळे मी पहिल्या दिवशी प्रचंड दमलो होतो. भाग्यश्री माझ्या पुढे गेली आणि सिंहगडावर माझ्या अगोदर ५ मिनिटे पोहोचली. मी ठरवले की आता जोरदार प्रॅक्टिस केली पाहिजे कारण मी रिटायर झाल्या पासून ट्रेक केलेच नव्हते. काही दिवस सुनभ बरोबर टेकडी वर सकाळी फिरायचो पण त्यात खंड पडला तो पडलाच आणि आता कैलास हा हाय अल्टीट्यूड वर आहे त्यामुळे प्रॅक्टिस जरुरीची आहे. 
(चायना इमिग्रेशन सेंटर)

सिंहगड वर फिरणे साठी जायचो तेव्हा बऱ्याच वेळेला येताना ट्रॅफिक मधे फसायचो त्यामुळे आम्ही ठरवले की आता वेताळ टेकडी वरच प्रॅक्टिस करायची. चार वेळेला सिंहगड वर गेलो त्यात श्री पंकज कुलकर्णी पडसलगीकर यांचे नातेवाईक यांच्या बरोबर कल्याण दरवाज्यातून एकदा सिंहगड चढलो. त्यानंतर मात्र आम्ही रोज टेकडी वर फिरायला जायचे ठरवले आणि टेकडी पूर्ण पालथी घातली. कधी विखे पाटील स्कूल वरून कधी कांचन गल्लीतून, कधी भांबुर्डा वन खात्याच्या ऑफिस जवळून तर कधी कोथरूड ARAI आणि कधी कोथरूड परमहंस सोसायटी कडून टेकडी वर चढून म्हातोबा, चतुश्रुंगी, कधी पाषाण कडे उतरून परत वर चढणे अशी रोज कमित कमी १० किमी चालण्याची प्रॅक्टिस करत राहिलो. साधारण ६ ते ८.३० आम्ही टेकडी वर चालायची प्रॅक्टिस केली. आपला मारुती पाशी जाऊन तिथून गजानन महाराज मंदीर आणि खाली शंकराचे मंदिरात जाऊन परत वर येऊन चतुःश्रृंगी आणि परत. कधी म्हातोबा आणि परत येताना वेताळ बाबा मंदिर.
पाऊस असला तरी चालायची प्रॅक्टिस सोडली नाही. डॉक्टर भाग्यश्री देखील मन लावून रोज यायचीच. रोज रात्री क्लिनिक वरून ११ वाजता येऊन परत सकाळी ६ वाजता टेकडी च्या पायथ्याशी हजर.  
त्यानंतर आम्ही दोन वेळा तळजाई टेकडी वर गेलो. एकदा सहकार नगर मधून तर दुसऱ्यांदा हिंगणे कडून. तसेच पर्वती वर एकदा गेलो.
(तिबेटमधील लायसेन्स ऑफिसर)

कैलास मधील दुसरा दिवस २२ किमी चालणे आहे आणि तोच दिवस महत्वाचा आहे असे सुनभ कडून समजले होते कारण त्याने २०१० मधे ही प्रदक्षिणा केली होती. त्यामुळे भाग्यश्रीने अजून एक ट्रेकर ट्रिनिटी चे श्री चेतन केतकर हे दूधसागर धबधबाचा ट्रेक काढत आहेत आणि साधारण २२ किमी ट्रेक आहे तेव्हा तो ट्रेक करू असे सांगितले. त्याप्रमाणे आम्ही पैसे भरले. पण अदल्या दिवशी दूध सागर धबधबा हा बंद केला होता कारण तुफान पाऊस होता. पण रात्री खूप उशीरा कळले की ट्रेक होऊ शकतों त्यामुळे आम्ही गोव्याला गाडीने जायचे ठरवले. शिबानी, मी आणि भाग्यश्री असे तिघे गोव्याला निघालो. दुपारी १२ चे पुढे पुण्यातून निघालो आणि रस्त्यात निपाणी पर्यंत चाललेल्या कामामुळे खूप उशीर होत होता. शिवाय धो धो पाऊस पण सुरू होता. आंबोली मध्ये आम्ही पोहोचलो तर प्रचंड धुके होते, घाटात चार फुटावरील काहीही दिसत नव्हते. अंदाज घेत घेत मी गाडी चालवली. कुठेही जास्त थांबू शकत नव्हतो कारण श्री श्रीखंडे यांचा गोव्यात फ्लॅट परवरी मध्ये होता त्याची किल्ली भाग्यश्रीने आणली होती आणि कुठल्याही परिस्थितीत रात्र व्हायच्या आत तिथे पोहोचायचे होते कारण परत सकाळी लवकर दूधसागर धबधबा गाठायचा होता.
शेवटी आम्ही गोव्यात रात्री ८ वाजता  पोहोचलो.
(सागा मधे जाताना रस्त्यातील स्मारक)

शिबानी सह आम्ही परवरीतच श्री श्रीखडे यांच्या फ्लॅटवर राहिलो. फ्लॅट खूप सुंदर आहे. प्रशस्त खोल्या आणि तीन बेडरुम हॉल, किचन आणि मोठ्या टेरेस सह असलेला मध्यवर्ती फ्लॅट आम्हाला मिळाला होता. दुसऱ्या दिवशी मी व भाग्यश्री दूध सागर धबधब्यावर जाणे साठी सकाळी ६ वाजता निघालो. सकाळी ७ वाजता पायथ्याशी पोहोचायचे होते पण निरोप आला की इतर लोक नऊ वाजे पर्यंत पोहोचणार आहेत. मग आम्ही जाताना मंगेशी, म्हाळसा आणि शांता दुर्गा मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पुढे दूधसागर धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचलो. बाकी ट्रेकर पण बसने येतच होते. गाडी पार्क करून नाष्टा करून आम्ही सकाळी १० वाजता बसने ट्रेक सुरू होतो तिथपर्यंत गेलो. रजिस्ट्रेशन करून ट्रेक सुरू केला. रस्त्यात काही ठिकाणी कंबरे पर्यंत पाणी होते ते क्रॉस करून आम्ही पुढे गेलो. ट्रेक खूप छान होता. चढ, उतार आणि जंगल पार करत आम्ही दूधसागर धबधबा पाहिला आणि डोळ्याचे पारणे फिटले. मस्त फोटो काढले, तिथली माकडे फार हुशार होती. पद्धतशीर सॅक ची चेन काढून आतील साहित्य पळवत होती. छान आनंद लुटून आम्ही परत फिरलो आणि साधारण सायंकाळी सहा वाजता हा ट्रेक संपला. २० किमी पेक्षा जास्त चालणे झाले होते शिवाय चढ उतार, जंगल इत्यादी मुळे कैलासचे दुसऱ्या दिवसाची प्रॅक्टिस झाली. सॅक खांद्यावर घेऊन ही प्रॅक्टिस झाली त्यामुळे थोडा कॉन्फिडन्स निर्माण झाला की आपण कैलास परिक्रमा पूर्ण करू शकू. भाग्यश्री ने तर दोन बाटल्या पाणी सॅक मधे घेऊन ट्रेक पूर्ण केला.
(चायना बॉर्डर वर पुलावर एक दिवस)

आता कैलास साठी पैसे भरले होते त्याप्रमाणे आम्ही २४ जुलैचे मुंबई काठमांडू आणि परत ५ ऑगस्टचे मुंबई साठीचे इंडिगो विमानाचे तिकीट काढले होते आणि चायना परमिट यायची वाट पाहात होतो. 
(सागा लां जाताना रस्त्यात )

दिनांक ८ जुलै रोजी नेपाळ चीन बॉर्डर वरील रसुवागडी येथील मैत्री ब्रीज भोटे कोशी नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याचे कळले. त्यामुळे बरीच लोक पलीकडे अडकली होती आणि आमचे परमिट देखील याच ठिकाणावरून जाण्यासाठी येणार होते. 

(मान सरोवर वरील जल्लोष)

त्यामुळे दोलायमान स्थितीत आमची यात्रा होणार का याची चिंता लागली होती. काही दिवसांनी समजले की चायनाने आता कोडारी मार्ग परत खुला केला आहे आणि त्या मार्गावरून कैलास मान सरोवर यात्रेसाठी लोकांना सोडत आहेत. यात्रेचे अंतर थोडे वाढणा होते पण यात्रा होईल असे वाटले आणि आमच्या अशा पल्लवित झाल्या.
(नायलम हॉटेल मालकीण सह)

२४ जुलै ची तारीख जवळ आली आणि समजले की परमिट आले नाहीये. त्यामुळे यात्रेला ब्रेक लागला आमचे परमिट चायना कडून वेळेत येऊ शकले नाही. त्यामुळे खूप निराशा आली होती. 

(दारचेन मधील कैलास दर्शन, रेनबो,हट)

कैलास मानसरोवरचा  सुंदर योग यावर्षी जुळून येणार का अशी चिंता होती. ही कैलास यात्रा सहजसाध्य नाही. यात्रेच्या पासूनच याची जाणीव पदोपदी येत होती.  त्यामुळे २४ ची नेपाळ ची तिकिटे शेवटी रद्द केली. ग्रुप वर बरीच चर्चा सुरू होती की पुढील तारीख कोणती घ्यायची कारण गणपती पण जवळ येत होते. जास्तीत जास्त १२ ऑगस्टला निघून २५ पर्यंत परत येणं होतं असेल तर परत सगळ्यांनी तयारी दाखवली आणि २८ लोकांनी त्याला पसंती दर्शवली. त्यानंतर रोज हीच उत्सुकता होती की परमिट आलं का? शेवटी असं कळलं की ते साधारणपणे ७-८ तारखेला येईल. तसं ते आलं आणि जीव भांड्यात पडला. मग काठमांडुला  जायचे तिकीटं १२ तारखेचे आणि परत यायचे २५ तारखेचे असे बुक केले. पण यावेळी आम्ही पुणे ते दिल्ली आणि पुढे काठमांडू आणि परत तसेच विमान तिकीट काढले.  
(तोता पाणी येथिल सुंदर महादेव)

पुण्यातून निघून आम्ही १२ ला काठमांडू ला दुपारी पोहोचलों. तिथे गेल्यावर समजले की दिल्लीवरून पासपोर्ट अजूनही आले नव्हते. मग एक दिवस काठमांडू दर्शन केलं. पशुपति मंदिरात जाऊन दर्शन घेतले.  १३ ला संध्याकाळी पासपोर्ट आले आणि १४ तारखेला सकाळी काठमांडू हून निघून तिबेट बॉर्डर वरून  नयालम या तिबेट मधील गावी पोहोचायचं ठरलं.
(मोरमट प्राणी)
(दारचेन मधून प्रथम कैलास दर्शन)

कैलास चा altitude खूप असल्याने मानसरोवर ला पोचायच्या आधी ३ रात्री हळूहळू वर चढत (acclimatisation) वातावरणाशी जुळवून घेणे आवश्यक असते 
(काठमांडू १३३७ मीटर उंचीवर आहे, पुढे कोडारी १०७ किमी अंतर आहे आणि कोडारीची उंची १९०० मीटर आहे. त्याच्या पुढे नायलम (तिबेट) ३८ किमी वर आहे आणि नायलम ३७५० मीटर उंचीवर आहे. नायलम ते सागा २९० किमी अंतर आहे आणि सागा ४६१० मीटर उंचीवर आहे. सागा ते मान सरोवर ४७८ किमी अंतर आहे आणि मानसरोवर ४५६० मीटर उंचीवर आहे. पुढे 
दारचेन ४६७० मीटर वर आणि आणि मानसरोवर पासून ४० किमी अंतर आहे. 
दारचेन पासून ६ ते ८ किमी वर यमद्वार आहे तिथपर्यंत गाडी जाते. यमद्वार ते डेरापुक हे साधारण १८ किमी ट्रेक अंतर आहे आणि डेरापूक हे ४८६० मीटर उंचीवर आहे. डेरापुक ते झुटुलपूक  २२ किमी ट्रेक  करून जावे लागते. झुटुलपूक ४७६० मीटर उंचीवर आहे पण रस्त्यात डोलमा ला पास ५६७० मीटर उंचीचा आहे. झुटुलपूक ते दारचेन १२ किमी ट्रेक आहे.)

(तोता पाणी मधील होटेल हॉट स्प्रिंग)

काठमांडू मधून सकाळी हॉटेल आम्ही सोडले. आधी हणमंते ही प्रार्थना सर्वांनी रिंगण करून म्हणली. हणमंते प्रार्थना अशी (हनुमंताने केला पूल, धोंडे गेले सगळे खोल,  आले वर जेव्हा त्यावर लिहिले राम राम राम) ही प्रार्थना रोज म्हणायची असा ग्रीन अर्थ या टीम चा दंडक आहे. खुप छान कल्पना आहे. 

(डेरापुक ला जाताना कैलास दर्शन)

बस ने प्रवास करत आम्ही पहिल्या दिवशी नायलमला मुक्काम करणार होतो परंतु कोडारी बॉर्डर क्रॉस करणे अगोदर एका ठिकाणी लँड स्लाईड झाले होतो त्यामुळे तिथला रस्ता वाहतुकतीस बंद होता. त्यामुळे आम्ही कोडारीचे अगोदर तातोपाणी  येथे हॉटेल हॉट स्प्रिंग येथे मुक्काम करायचे ठरवले. 

(डेरापुक मधून कैलास चे दर्शन_
चरण स्पर्श साठी येथूनच जातात)

तातोपाणी हे ठिकाण खूपच सुंदर आहे. पलीकडे तिबेट आणि अलीकडे नेपाळ मध्ये हिमालयातील खळाळती नदी. तातोपाणी म्हणजे गरम पाण्याचा झरा. तिथे नदी किनारी खूप मस्त गरम पाण्याचा झरा आहे. एक बाजूला पुरुष तर दुसऱ्या बाजूला स्त्रिया अशी तिथे आंघोळीची सोय आहे. शिवाय कपडे बदलण्यासाठी वेगवेळ्या खोल्या आहेत.  वेस्टर्न स्टाईल टॉयलेट आहेत. तिकीट प्रत्येकी १०० नेपाळी रुपये इतके आहे. मी आणि निरंजन ने गेलो त्याच दिवशी मस्त गरम पाण्यात अंघोळ केली. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळा ग्रुप गरम पाणी ने अंघोळ करणे साठी पहाटे पाच वाजता कुंडावर आला. सगळे लोक छान फ्रेश झाले निसर्ग राजा चे रूप न्याहाळत सगळ्यांनी मनसोक्त फोटो काढले. तिथे मोठी शंकराची मूर्ती आहे शिवाय सुंदर देवालय देखील आहे. 
(दारचेन मधून कैलास)

सगळे लोक न्याहारी करून कोडारी बॉर्डर साठी निघालो. जिथे जमीन खचली होती तिथपर्यंत बस गेली पुढे सगळे लोक ट्रेक करत दगडातून वाट काढत पलीकडे गेले आणि नेपाळी पोर्टरनि आमचे सर्व सामान पुढे नेले. एकदा या कोसळलेल्या रस्त्यावरून पुढे गेल्यावर तिबेट बॉर्डर  पर्यंत उघड्या जीप ने आम्ही प्रवास केला. नेपाळ सरकारने इमिग्रेशन करताना आता मात्र डिपोर्टेड चा शिक्का आमच्या पासपोर्ट वर मारला आणि आम्ही नेपाळ तिबेट बॉर्डर वर नदीवरील पुलावर सकाळी ९ चे सुमारास पोहोचलो. आम्ही आमचा चीन मधील लायसेन्स ऑफिसर यायची वाट पाहत होतो कारण जो पर्यंत तो येत नाही तो पर्यंत आम्ही चीन बॉर्डर क्रॉस करू शकत नाही. सकाळी नऊ ते १ पर्यंत बरेच ग्रुप बोर्डरपास करत होते पण आम्ही तिथेच उभे होतो. मधेच जेवणाची सुटी होती म्हणून गेट  २.३० पर्यंत बंद होते. परत गेट उघडल्यावर दुपारी चार पर्यंत आम्ही बॉर्डर वरच उभे होतो. तिथे कोणतीही सोय नाही. ना खायला काही आहे, ना टॉयलेट आहेत. वर डोक्यावर छप्पर पण नाही. ऊन वारा आणि पाऊस यामुळे लोक खूप वैतागले होते.

(डेरापुक वरून डॉल्मा पा वर जाताना दर्शन)

शेवटी आमचा तिबेटी लायसेन्स ऑफिसर  दुपारी ४ चे सुमारास पलीकडे बॉर्डर वर पोहोचला. तो नायलम मधून येताना ट्रॅफिक मधे फसला होता असे कळले. शेवटी पाच चे सुमारास आम्हाला इमिग्रेशन साठी घेऊन गेला. परमिट लिस्ट, पासपोर्ट आणि आमचे सामान चेक केल्यावर आम्हाला पुढे तिबेट म्हणजे आताचे चीन मध्ये प्रवेश मिळाला.  
इथून पुढे सर्व चायनिज सरकारच्या मर्जीने होणार होते. कारण लायसन ऑफिसर आमच्या बरोबर राहणार होता आणि एक बस, एक १० सीटर गाडी आणि एक जेवायच्या सामानाची गाडी असा लवाजमा बरोबर असणार होता. नायलम येथे आम्ही पोहोचलो आणि टुरिस्ट सेंटर वर पोहोचलो तर तिथे तोबा गर्दी होती. आम्ही तिथे आमच्या नेपाळ मधील स्टाफ ने तयार केलेला मस्त गरम चहा, बिस्कीट, सूप आणि जेवण जेवले. सगळे लोक छान जेवले कारण दुपारचे जेवण झाले नव्हते. पुढे नायलम येथील एक हॉटेलमध्ये आमची रहायची सोय केली होती. ते हॉटेल बरीच वर्षे बंद होते त्यामुळे तेथील सोयी सुविधा तेवढ्या चांगल्या नव्हत्या. कॉमन इंडियन टॉयलेट होती पण अंघोळ करणेची सोय नव्हती. थंडी छान होती. ४-५ जणांना एक अशा जेमतेम खोल्या होत्या आणि त्यात कॉमन चार्जिग पॉईंट होता. मी वेगळी थ्री पिन घेऊन गेलो होतो त्यामुळे आम्ही सगळ्यांनी फोन चार्ज करून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल बाहेर रस्त्यावरच नेपाळी स्टाफ ने छान नाश्ता लावला होता त्याचा समाचार घेतला आणि पुढे  सागा या गावाला जाण्यासाठी तयार होऊन बाहेर आलो आणि समजले की नायलम च्या पोलिसांकडून  पासपोर्ट अजून आले नाहीयेत. इथे ज्या गावी आपला मुक्काम असतो त्या प्रत्येक ठिकाणी आपला पासपोर्ट पोलिस स्टेशन कडे जातो आणि गाव सोडायच्या दिवशी परत मिळतो. बारा पर्यंत वाट पाहिल्यावर पासपोर्ट आले आणि आम्ही सागाला जायला निघालो. आधी हणमंते केला आणि बस ने निघालो. नायलम ते सागा हा रस्ता आपल्या लेह लडाख सारखा आहे. 
हिमालयाच्या अथांग पर्वतरांगांचे विलोभनीय रंग, सतत दिसत रहाणारी शुभ्र  पर्वतशिखरे आणि तलाव. दुपारचे जेवण आम्ही अशाच एका निळ्याशार विस्तीर्ण तळ्याच्या काठी केले. सगळ्यांनी छान फोटो सेशन केले. समोर बर्फाच्छादित शिखरे आणि आजूबाजूला पताका लावलेल्या. सायंकाळी आम्ही सागाला पोहोचलो. सागा एक टुमदार गाव आहे. थोडं फ्रेश होऊन आम्ही गावात एक चक्कर मारली. Altitude जाणवत होता. चालताना थोडा दम लागत होता.  त्या रात्री बऱ्याच जणांना ऍसिडिटी, डोकेदुखी, सर्दी अंगदुखी चा त्रास झाला. पण दुसरा पूर्ण दिवस acclamatisation मुळे मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी दोन तीन चकरा मारून आलों.
(डॉल्मा पा वरील चढाई)

इथे मोठे मोठे मॉल आहेत पण कुठेही क्रेडिट कार्ड ने खरेदी करता येत नाही. सर्वत्र फक्त युवांन ही चायनिज करन्सी रोख स्वरूपात घेता येते. बऱ्याच लोकांनी छोटी मोठी खरेदी केली. इथे करन्सी एक्सेचेज साठी विशेष सोय नाही. आम्ही सर्व जण एकत्र मार्केट मध्ये फिरत होतो. तिथे केदार ने आम्हाला याक क्रीम पासून तयार होणारा वेगळा चहा एका छोटेखानी हॉटेल मधे पाजला. ते पेय आणि हॉटेल मधे सर्व करणाऱ्या दोन मुली खूप सुंदर होत्या.  आम्ही थोडे मार्केट फिरल्यावर मी आणि भाग्यश्री एका मॉल मध्ये गेलो तिथे समजले की तिथे एक ऍग्रो बँक आहे तिथे एटीएम आहे त्यातून आपण युवान विथठ्डरॉ करू शकू. 
(डॉल्मा वर जाताना मागे सोनेरी कैलास)

आम्ही ती बँक शोधून काढली आणि तिथून एचएसबीसी डेबिट कार्ड द्वारे २००० युवान काढले. युवांन शिवाय पुढे निभाव लागणार नाही त्यामुळे त्याची आवश्यकता होती. 
१८ तारखेला सकाळी लौकरच निघालो. परंतु निघायच्या आधी कळले की श्री तुषार यांच्या घरी काही अघटीत झाल्यामुळे त्यांच्या बरोबर असणाऱ्या दोघी असे तिघे जण सागावरून काठमांडू आणि तिथून पुण्यास परत जात आहेत. शेवटी ईश्वर इच्छा पुढे काही नाही आणि माणूस काहीही करू शकत नाही हे पुन्हा अधोरेखित झाले. इतक्या लांब येऊन परत दर्शन न घेता जाणे म्हणजे किती जीवावर अले असेल पण माणूस काहीही करू शकत नाही.
(गौरी कुंड चे विहंगम दृष्य)

आमच्या चायनिज लायसेन्स ऑफिसरने या तीन लोकांना परत जाणे साठी मंजुरी देणे आवश्यक आहे तसेच या तिघांचे जाण्यासाठी पत्र देणे जेणे करून इमिग्रेशन करताना त्यांना त्रास होणार नाही. तसेच राहिलेल्या ग्रुप मधील 28 लोकांची यादी तयार करणे आणि त्या प्रमाणे परमिट मध्ये बदल करणे इत्यादी गोष्टी केल्यानंतर लायसेन्स ऑफिसर 
ने आमची बस आणि इतर गाड्या सोडल्या आणि स्वतः देखील एका स्वतंत्र गाडीने आमच्या बरोबर आले. सदर लायसेन्स ऑफिसरची गाडी ही रेस्क्यू व्हेहिकल म्हणून वापरता येते असे नंतर कळले.
शेवटी मानसरोवरला जाणे साठी आम्ही सागा वरून निघालो. ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास त्या कैलास आणि मानसरोवरापैकी मानसरोवर आम्ही याची देही याची डोळा बघणार होतो. सकाळी 7 वाजत निघालो तेव्हा धुआंधार पाऊस होता. बस यायला उशीर होत होता पण अचानक ड्रायवर हॉटेल वर आले आणि सगळ्यांना चलो चलो म्हणले. भर पावसात सगळे गाड्यात जाऊन बसले.  पुढे गेल्यावर तर वाटेत स्नो फॉल चालू झाला. थंडी वाजत होती पण एक प्रकारे मन उल्हसित होत होते त्यामुळे मजाही येत होती. हा ४७८ किलोमिटरचा रस्ता अतिशय मनोहर होता. सुंदर, सरळ रस्ता, आजूबाजूला मैलोनमैल पसरलेली छोटी छोटी कुरणे, त्यात दिसणारे याक आणि कियांस हे प्राणी मागे अथांग पर्वतरांगा. ब्रह्मपुत्रा नदीचा खळखळ वाहणारा प्रवाह. एका तळ्याकाठी आम्ही दुपारचे जेवायला थांबलो. समोर छान निळे शार पाणी मस्त हवा आणि गरम गरम जेवण. जेवण करून झाल्यावर पुढचा प्रवास करून मानसरोवरला सायंकाळी पाचचे सुमारास पोहोचलो. तिथे लायनीत बसेस होत्या. त्यातील एक बस चीन सरकारने आम्हाला दिली. त्या बसमधे आम्ही चढलो आणि मान सरोवरची परिक्रमा बसने सुरू केली जी जवळपास १०० किलोमीटरची आहे. परिक्रमा चालू झाली आणि आम्ही त्या अनंतशयनी विष्णुदेवाचे आणि त्याच्या नाभीकमलातून उगवलेल्या ब्रह्मदेवाचे निवासस्थान डोळे भरून पहायला सुरवात केली. हिरव्या, निळ्या, राखाडी रंगाच्या मनमोहक छटा. पुढे जाऊन एका ठिकाणी काठावर आमची बस थांबली. खाली उतरून सरोवराच्या पवित्र, शीतल पाण्याचा स्पर्श होताच एक सुखद संवेदना आणि कृतज्ञतेने मन भरून आलं. शांतपणे पाण्यात थोडावेळ थांबून नंतर सगळ्यांनी मिळून काठावर विष्णुसहस्रनामाचे पठण केले. संधिकालीतील हा अनुभव भारून टाकणारा होता. चायना सरकारने आता या सरोवरात स्नान करायला मज्जाव केला आहे. त्यामुळे फक्त पाय डुबवून अंगावर पाणी शिंपडून आम्ही सरोवरा वर बसलो. एकत्रित विष्णु सहस्र नाम पठण केल्या मुळे सगळे अगदी तृप्त झाले होते. 
त्यानंतर परत बस मधे बसून आम्ही पुढे सरोवराच्या काठावरील एका छोटे खानी हॉटेल मधे मुक्कामास गेलो. तिथे देखील  चार सहा जणांना एका खोलीत राहण्यासाठी सोय होती. टॉयलेट मात्र लांब होते तेही खूप खराब होते. त्यामुळे रात्री बाहेर जाऊन उरकणे एवढेच आपल्या हाती. रात्री जेवण करून 
त्या रात्री काही लोक पहाटे तीन ते सकाळी पाच पर्यंत सरोवर कडे पाहात बसले होते. त्यातील भाग्यवान लोकांना सरोवरात तारे पडताना आणि फिरताना दिसले. 
रात्री चार पाच लोकांनी सकाळी मानस सरोवर वरती रुद्र अभिषेक करणे साठी उत्सुकता दर्शवली होती. त्यात मीही एक होतो. 
त्यामुळे सकाळी आठ वाजता आम्ही एका हॉल मध्ये पोहोचलो. तिथे गुरुजी वाटच पहात होते. आम्ही पाच जणांनी (मी, माधव लेले, आनंद दाते, श्री संदीप व सौ ललिता सारडा ) तिथे एकत्र स्पटिक शिवलिंग भोवती बसून रुद्र अभिषेक केला. गुरुजींनी बरोबर एक तास सुंदर पूजा आमच्या कडून करून घेतली. पूजा करताना तूप, दूध, मध, साखर, दही अशी पाच ही पदार्थांनी वेगवेगळ अभिषेक घालताना दिसलेले विलोभनीय स्पटिक मूर्तीचे दृश्य दिसले. स्वच्छ अशा सरोवर  पाण्याने अभिषेक, रुद्र पठण आणि नंतर शेवटी गणपती, शंकर आणि गौरीची आरती म्हणून पूजा सांगता झाली. आम्हा सगळ्यांना खूप छान अनुभूती, समाधान त्यातून मिळाले. पूजा संपल्यावर प्रत्येकाला एक धागा गुरुजींनी बांधला. पूजा संपल्यावर लगेचच भाग्यश्री तिथे आली त्यामुळे तिला देखील गुरुजींनी आशीर्वाद रुपी धाग्याचे बंधन बांधले. 
सगळे कसे मस्त खुश होते. 
(परत येताना जरा करमणूक)

त्यानंतर आम्ही मानसरोवराच्या काठाने रमतगमत चांगली दोन तास भटकंती केली. समोर उगवता सूर्य. एका बाजूला ढगांआड दडलेला कैलास, दुसऱ्या बाजूला ओंकारमांधाताच्या बर्फाच्छादित शिखररांगा, मानसरोवरात यथेच्छ विहार करणारे हंसपक्षी आणि वर निळंभोर आकाश. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच! 

खुप लांब पर्यंत आम्ही फिरायला गेलो तर चायनिज गार्ड तिथे गाडी घेऊन आला आणि आम्हाला परत जाणे साठी सांगितले. आम्ही तिथे मस्त पॅनोरमिक फोटो ग्राफी, व्हिडिओ केले. पक्षी पोहताना, उडताना आणि सर्व सरोवर असे छान व्हिडिओ केले.
(झुटुलपूक वरून दारचेन ला जाताना)

त्यानंतर सर्वांनी एकत्रित मानसरोवराचे काठावर शिवपूजा, शिवस्तुती केली. सर्व अद्भुत दृश्य मनात साठवून दुपारी आम्ही पुढे दारचेनला निघालो. दारचेन साधारण तासाभराच्या अंतरावरच आहे पण त्या प्रवासातील प्रत्येक क्षण म्हणजे एक अद्भुत निसर्गचित्र आहे. दारचेन थोडे अजून उंचीवर असल्याने तिथून खालच्या पूर्ण निळ्याशार मानसरोनवराचे विहंगम दर्शन तर होतेच आणि याच प्रवासात अखंड बर्फाच्छादित, मनोहारी, रहस्यमयी, अद्भुत कैलास पर्वताचे ही जवळून प्रथमदर्शन झाले. 
दारचेन मध्ये एका मोठ्या हॉटेल मधे प्रथम गेलो असता तिथे जागा नव्हती. त्यामुळे दुसऱ्या हॉटेल मध्ये गेलो. तिथे छान हट होत्या प्रत्येक हटला स्वतंत्र टॉयलेट होते. गादीला गरम होण्यासाठी इलेक्ट्रिक कनेक्शन होते. त्यादिवशी आम्ही हट मधून बाहेर अलो आणि कैलासने आमच्यावर प्रसन्न होत मुक्तपणे  उधळण केली. ते विहंगम दृश्य खूप मनोहारी होते. सर्वजण समोर पूर्ण दिसणारा कैलास डोळ्यात साठवत होता. प्रत्येक जण घरी व्हिडिओ कॉल करून त्याचे दर्शन आपल्या अप्तजनाना देत होता. कैलास दर्शन जेव्हा होते तेव्हा जो आनंद मिळतो त्यासाठी कोणतेही शब्द नाहीत.  रात्री आम्ही गरम गरम जेवण करून झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी आपल्या डफल बॅग देऊन पुढील वाटचाली साठी छोट्या छोट्या सॅक तयार करून घेतल्या. काही लोकांनी आपल्या बॅग बरोबर येणाऱ्या पोर्टर कडे देण्यासाठी तयार केल्या होत्या. प्रत्येकाने एक छोटी बॅग याकवर देण्यासाठी जमा केली त्यात फक्त एक वेळचे कपडे होते. बसने सर्व जण यमद्वार कडे प्रस्थापित झालो. आता खरी चालणेची परिक्रमा सुरू झाली होती. 
दारचेन ते यमद्वार अंतर बसने पार केल्यावर आम्ही सगळे एकत्र जमलो आणि यम द्वार येथे नऊ प्रदक्षिणा मारून द्वार क्रॉस केले आणि परिक्रमा सुरू झाली. थंडगार हवा आणि भुरभुरू चालू झालेला पाऊस मनाला सुखावत होता. समोरचा भव्य देखावा पाहून मन दिपून गेलं होतं.  एक बाजूला पायवाट, दुसऱ्या बाजूला सतत खळखळ वहाणारी कैलासावरून धावत मानसरोवराकडे चाललेली नदी, दुसऱ्या बाजूला बऱ्याच दूरवर पसरलेले सपाट पठार, काही ठिकाणी गवताळ कुरणे आणि या दोन्ही बाजूंना वेढणारे हिमालयाचे ते अजस्त्र आणि गूढ कडे. ज्यांच्याकडे निरखून पाहिलं तर त्यात कितीतरी विविध आकार दिसत होते. कित्येकांच्या मस्तकावरून, खांद्यावरून झरे, धबधबे वहात होते. प्रत्येक जण आपापल्या गतीने निसर्गाची ही अद्भुत किमया मनात आणि डोळ्यात साठवत कैलास प्रदक्षिणा करत होता. या मार्गांवर पुढे कैलास पर्वताचे पश्चिम दिशेचं दर्शन झाले. वाटेवर याकचे कळप खूप दिसले. काही ठिकाणी मोठे धीट मोर्मट प्राणी बिळांमधून बाहेर येऊन काहीजणांनी दिलेले अन्न पदार्थ खात होते. संपूर्ण मोर्मट फॅमिली काही ठिकाणी होती. हा प्राणी आपल्याकडे स्पिती मध्ये दिसतो. मस्त फोटो काढत, झऱ्याचे पाणी पित आम्ही पुढे पुढे जात होतो. साधारण चारच्या सुमारास हवा अचानक बदलली आणि बर्फबारी सुरू झाली त्यामुळे  वातावरण एकदम थंड झाले, बोटे नम झाली. प्रत्येकाने आपले आणलेले रेनकोट घातले तरी पाऊस लागतच होता. अखेर देरापूकची आमची राहण्याची जागा दिसली. महिलांना इथे सोय होती पण पुरुषांना दुसरीकडे सोय होती. फक्त झोपण्यासाठी कॉट टाकल्या होत्या. टॉयलेट बाहेर एकत्रित होते, तिथे फक्त वरून खड्डा होता, पाणी नव्हते. सार्वजनिक संडास होते फक्त छोटे कठडे दोन मधे होते. 
(अथांग मान सरोवर)

राहण्याच्या ठिकाण वरून समोरच कैलासचे दर्शन  होत होते. थोडा वेळ विश्रांती घेतल्यावर मी आणि भाग्यश्रीने हॉटेल बाहेर येऊन मागे असलेल्या कैलासचे जवळून दर्शन घेणेसाठी निघालो एक डोंगर चढून वर गेलो आणि समोर उभा असलेला विहंगम कैलास डोळ्यात, कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न केला. नंतर मी एकटाच पुढे अजून वर गेलो. चरण स्पर्श करणे साठी पुढे गेलो. चार एक जण माझ्या पुढे होते त्यांना गाठले. ते बंगलोर वरून अले होते. पण पुढे जाणे शक्य नव्हते कारण हवामान खूप खराब झाले होते. मी तर हॉटेल मध्ये भिजलेले कपडे काढून केवळ इनरवर बाहेर पडलो होतों, रेन कोट नव्हता की टोपी नव्हती. 
त्यामुळे पुढे जाणे बरोबर नव्हते. शिवाय खूप उशीर झाला होता. बंगलोरचे लोक आणि मी सगळे एकत्र थांबलो तिथे वेगवेगळे फोटो काढले आणि परत फिरलो तर तेवढ्यात श्री संदीप सारडा तिथे आले. मग त्यांच्या बरोबर फोटो काढून आम्ही सर्व जण परतीच्या वाटेवर आलों. खाली आलो तेव्हा कळले की आता चरण स्पर्श करणे साठी परवानगी नाही आणि काही लोकांना चायनिज अधिकारी लोकांनी अडवून परत पाठवले असे कळले. 
शिवाय मी DRDO चे जॅकेट मध्ये होतो त्यामुळे ग्रूप मधील लोक चिंता करत होते. आम्हाला पाहिल्यावर सगळे लोक निश्चित झाले. त्यानंतर नेपाळी कूकनी केलेले मस्त सूप पिले, जेवण केले आणि 
ओले कपडे बदलले, ओले बूट काढले आणि तडक झोपून गेलो. 
दुसऱ्या दिवशी लवकर बाहेर पडायचे होते कारण लांबचा पल्ला होता. रात्री आमच्या ग्रूप मधील पाच जण दुसऱ्या दिवशी झुटुलपूक ऐवजी दारचेनला परत जाण्यासाठी निघाले. कारण त्यांना पुढील अवघड पल्ला पार करणे साठी शरीर साथ देणार नाही असे वाटत होते. 
(परिक्रमा पूर्ण केल्यावर आनंद )

दुसऱ्या दिवशी पहाटे 6 वाजता अंधारातच आम्ही पुढील प्रवासास सुरुवात केली. जवळपास ६ किलोमीटर  चढ चढल्यावर डोलमा पास लागणार होता. रस्त्यात सात वाजल्याचे सुमारास सूर्य उगवण्यास सुरुवात झाली आणि समोर कैलासचे विहंगम दृश्य दिसत होते. सोनेरी सूर्यप्रकाशात कैलास नाहून निघत होता आणि सोनेरी दिसत होता. ग्रूप मधील सर्व जण सुमारे 20 मिनिटे कैलासावर होत असलेली सुवर्ण किरणांची पाखरण पाहात होते. 
बऱ्याच लोकांनी प्रत्यक्ष व्हिडिओ केले,  फोटो काढले. 
त्यानंतर पुढील चढाईला सुरुवात केली. सुमारे 50 ते 60 पावले चालले की दम लागायचा कारण 18000 फूट उंचावर चालणे खूप कठीण होते. शेवटी एकदाचे आम्ही दुपारी 2 चे सुमारास डोल्मा पास वर चढलो. डोल्मा पास येत नव्हता तो पर्यंत तो खूप लांब वाटायचा. एकदा पास आला आणि सर्वांना हायसे वाटले. झकास फोटो सेशन केले आणि पुढील वाटचालीस सुरुवात केली. 
पुढे तीव्र स्वरूपात उतार होता. खाली गौरी कुंड दीसत होते. उतारावरून खाली जात असताना सावकाश जावे लागत होते. घोडे वाले लोक जास्त होते त्यांना आधी रस्ता द्यावा लागत होता. घोड्यावरून बसून खाली जाता येत नव्हते. त्यामुळे सर्व घोडे वाले लोक मोकळेच जात होते. प्रत्येक माणसाला स्वतः चालूनच खाली जावे लागत होते. घोडा फक्त वर चढणे पुरता वापरता येत होता. 
आम्ही खाली पोहोचल्यावर खाली टी हाउस मध्ये चहा घेतला आणि परत पुढील वाटचालीस सुरुवात केली. शेवटी सायंकाळी 6 वाजता झुटुलपूक येथे पोहोचलो. बरोबर 12 तास पायी चालत आम्ही 22 किमी चे अंतर एकदाचे पूर्ण केले. शेवटी शेवटी कधी एकदा आपण पोहोचतो असे झाले होते.
पोहोचल्यावर मस्त गरम चहा बिस्कीट घेतली. हळू हळू सर्व जण झुटुलपूक येथे पोहोचले. शेवटचा ग्रुप रात्री 9.15 वाजता पोहोचला. सुमारे 15 तास पायपिट करून त्यांनी दुसरा दिवस पूर्ण केला. सगळ्यांनी जेवण करून आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता परत दारचेन येथे जाण्यासाठी निघालो. सुमारे तीन तासात आम्ही चाललो आणि समोर राक्षस ताल दिसला. आम्ही दारचेनचे दुसऱ्या बाजूला पोहोचलो. तिथे बसेस उभ्या होत्या. सर्व 23 लोकांनी ही परिक्रमा यशस्वी रित्या पूर्ण केली. प्रत्येक व्यक्ती ही सुखी समाधानी आणि कृतकृत्य झाल्या सारखी दिसत होती. सर्व लोकांनी एक छान ग्रुप फोटो काढला आणि परती साठी बस मधे बसलो. 
हॉटेल मधे जाऊन आपल्या बॅग आणि तिथे परत आलेल्या पाच ग्रूप मेंबर ना बस मधे घेऊन आम्ही परत मान सरोवर येथे गेलो. 
तिथे आधीची बस उभी होती त्यात सर्व सामान भरले आणि आम्ही सागा ला जाणे साठी सज्ज झालो.
रात्री सागाला पोहोचलो आणि सर्व लोक खूप आनंदी होते. कित्येक लोकांनी पाण्याने अगदी आरामात स्वच्छ आंघोळ करणे या साध्या गोष्टीतील मजा सागा येथील हॉटेल मधे घेतली. रात्री आरामात सगळे झोपले आणि सकाळी उठल्यावर आम्ही परत नायलम येथे जाण्यासाठी बस मधे बसलो.
सायंकाळी नायलम येथे पोहोचून परत त्याच हॉटेल मधे आम्ही राहिलो. दुसऱ्या दिवशी सकाळी नायलम येथून कोडारी बॉर्डर वर इमिग्रेशन पूर्ण करून आम्ही नेपाळ मध्ये आलो. तेव्हा घरी आल्यासारखे वाटले. कारण तिबेट बॉर्डर मधील सगळी घरे ही मोकळी होती. कुठेही डोंगरात किंवा रस्त्यावर एक माणूस देखील दिसत नव्हता. नायलम नंतर पुढे कोठेही मोठे झाड दिसत नव्हते. प्रत्येक ठिकाणी चायना सरकारने घरे बंद ठेवून त्यावर विशिष्ट बोर्ड लावले होते. गाव दिसत होते पण माणूस दिसत नव्हता. त्या उलट नेपाळ मधील बॉर्डर वर छोटी छोटी घरे दिसत होती. डोंगरावर देखील छोटी छोटी घरे दिसत होती. सर्वत्र हसरी माणसे दिसत होती. त्याउलट चीनमधील मोठ्या शहरात लोक होते पण लोक विचित्र वाटत होते. विशेष बोलत नव्हते की हसत नव्हते. 

नेपाळ मधील लोक, ड्रायव्हर  मात्र मस्त गप्पा मारून, हसून होते. त्यामुळे खूप बरे वाटत होते.
कोडारी बॉर्डर ते काठमांडू रस्ता आम्ही सुमारे सहा तासात पार केला. सायंकाळी काठमांडू गाठले. त्यानंतर आम्ही परत काठमांडू मधील पशुपति मंदिरात गेलो आणि देवाचे आभार मानले.
दिनांक 25 रोजी सकाळी काही लोक मंदिरात गेले तर काहींनी हॉटेल मधे राहणे पसंद केले. शेवटी 10.30 वाजता हॉटेल सोडून आम्ही काठमांडू येथील विमान तळावर जाण्यासाठी बस मधे बसून 11.30 वाजता पोहोचलो. 
तिथे विमानाची वाट पाहत ग्रुपने हसत खेळत आम्ही टाईम पास केला. आणि परतीचा प्रवास सुखरूप झाला.
सगळ्यांनी एकमेकांना बायबाय केलं. आमची १४ दिवसांची स्वप्नवत कैलास मान सरोवर यात्रा सुफळ संपूर्ण झाली.

जय जय भोलेनाथ!


3 comments:

  1. खूप छान शब्दात संपूर्ण कैलास मानसरोवर दर्शन आणि प्रतिक्रमेचा वृत्तांत दिला आहे. वाचताना पुन्हा त्या मंतरलेल्या तेरा दिवसांमध्ये पोहोचले. आपला ग्रूप एकसंध होता आणि एकत्रित आपल्या सर्वांना खूप समाधान मिळाले. तुमच्या सारख्या चांगले सहप्रवासी लाभलेले. आपल्या सर्वांवर कैलासराणाने खास कृपा दृष्टी ठेवली असं जाणवलं. जातानाचा प्रवास पण उत्तम झाला. भाग्यश्री बरोबर आधी ट्रिप केल्या होत्याच, पण कैलास यात्रा अद्भुत चमत्कारच आहे असं म्हणायला हरकत नाही. तुमच्या वर्णनाने आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद, श्री विजय सागर जी!!
    कल्पना गुप्ते

    ReplyDelete
  2. Very wonderful detailed it inspired me to take this tour next year

    ReplyDelete
  3. 🙏सागर सर
    खूप छान वर्णन,खूप छान अनुभती आपण सर्वांनी घेतली सर.
    छान कैलास व मानससरोवर चे दर्शन आपण काढलेल्या फोटो द्वारे झाले.आपण ज्या प्रकारे सर्व प्रवासाचे वर्णन केले त्यासाठी शब्दचं अपुरे आहेत. खूप खूप धन्यवाद 🙏

    ReplyDelete