मी एप्रिल महिन्या पासून जाहिरातींवर लक्ष ठेऊन होतो. एप्रिलचे पहिल्या आठवड्यात जाहिरात आली आणि त्यानुसार मग मेडिकल करायला म्हणून ससून हॉस्पिटल मध्ये गेलो तर मला तिथे आता मेडिकल होत नाही तर औंधला जनरल हॉस्पिटल मध्ये मेडिकल साठी जावे असे सांगितले गेले.
आर एफ आय डी यात्रा कार्ड
चंदन वाडी कडून येणारा मार्ग
यात्रेला सुरुवात
वरून दिसणारी नदी
आर्मीचे लोकांचा बोर्ड
बारीमार्ग येथील मेडिकल कॅम्प
प्रथम गुफा दर्शन
रस्त्यात दिसणारी मेंढर
गुफा दर्शन
जाहिरातीनुसार सरकारी हॉस्पिटल मधील मेडिकल रिपोर्ट लागत होते. मग विचार केला आपण केंद्र सरकारी रिटायर कर्मचारी मग जाऊ आपल्या CGHS मध्ये असा विचार करून CGHS ला गेलो आणि तिथे विविध टेस्ट करून डॉक्टर ने दुसऱ्या दिवशी बोलावले.
सर्व टेस्ट मध्ये फिट रिपोर्ट आल्यामुळे मला सहज मेडिकल फिटनेस रिपोर्ट मिळाला.
मेडिकल रिपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो असे एकत्र करून फोटो काढला आणि पीडीएफ करून पाठवले.
कैलास मानसरोवर जायच्या आधी मी टेकडी चढणे आणि चालणे अशी प्रॅक्टिस केली होती पण यावेळी व्यस्त कार्यक्रमामुळे मला प्रॅक्टिस करायला वेळच मिळाला नाही.
कारण यात्रा साठी पुण्यातून जायची तारीख होती 10 जुलै आणि मी गेले महिनाभर आधी कोईमतुर येथे ग्राहक पंचायत चे दक्षिण क्षेत्र अभ्यास क्रम साठी गेलो होतो त्यात 6 दिवस गेले, नंतर गणपती पुळे येथे महाराष्ट्रातील चार प्रांताचे अभ्यास क्रमात 5 दिवस गेले, गुजरात मधील वडोदरा येथील राष्ट्रीय कार्यकारिणी मीटिंग आणि त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अशा महिना भरातील व्यस्त कार्यक्रमामुळे आणि त्यात खोकला आणि सर्दी मुळे पण बेजार होतो.
असो जशी ईश्वर इच्छा तसे घडले. मी शिबानीला घेऊन जायचे ठरवले होते कारण तिची खूप इच्छा होती. मी जाणार म्हणून कळल्यावर माझी कैलास मान सरोवरची पार्टनर डॉक्टर भाग्यश्री पडसलगीकर देखील यायला तयार झाली. तिने पंकज कुलकर्णी या नातेवाईकांना सांगितले त्यामुळे श्री पंकज कुलकर्णी आणि त्यांची पत्नी दोघेही यायला तयार झाले. अजून एक नातेवाईक श्री भंडारी आणि त्यांची पत्नी देखील यायला तयार झाले. इकडे शिबानीची वहिनी सविता गरुड पण यायला तयार झाली. सगळ्यांची मेडिकल ओके झाली आणि तिकिटे बुक झाली.
पण यावेळी सरकारने हेलिकॉप्टर आणि द्रोण यांवर बंदी घातली होती त्यामुळे पायी जाणे किंवा घोडा, पालखी असे ऑप्शन होते.
बालताल मार्गे पायी जायला साधारण 14 किमी अंतर हे डोमेल येथील एंट्री गेट पासून आहे.
पालखीचे सर्व केले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुणे ते श्रीनगर प्रवासाला निघालो.
पुण्यातून रात्री 12.15 वाजता दिल्ली साठी विमान होते ते 2.15 वाजता दिल्ली येथे पोहोचले. दिल्लीतून 8.20 वाजता विमान होते त्यामुळे साधारण 5 तास लेओवर होते.
आम्ही जरा लाउंज मधे जाऊन खाल्ले आणि आराम करायला बसलो पण मला काही झोप येत नव्हती. त्यामुळे पूर्ण रात्र भर जागाच होतो. शेवटी विमान लागले आणि आम्ही श्रीनगर येथे पोहोचलो ते सकाळी 9.30 वाजता.
तिथे गेल्यावर आपला प्रीपेड मोबाईल चालत नाही त्यामुळे नवीन सिम कार्ड घेतले. त्यात बराच वेळ गेला.
मग बाहेर पडून नाश्ता करून सोनमर्ग इथे पोहोचलो.
सोनमर्ग इथे जेवण झाल्यावर टूर कंपनीने एका घोडे आणि पालखी वाल्याला बोलावले होते. त्यांनी पालखी चे ऑफिशियल 17000 चे ऐवजी 20000 लागतील आणि घोड्याचे 6000 लागतील असे सांगितले. खरे तर 8 लोकांना पालखी आणि 10 लोकांना घोडा हवा होता त्यामुळे सरकारी रेट पेक्षा थोडे कमी लागतील असे टूर वाल्याने आधी सांगितले होते पण काय कारण असावे कळत नाही एवढे जास्त पैसे सांगितले. आम्हाला सांगण्यात आले की तिथे गर्दी असते, सकाळी वेळ जाईल, पर्ची काढताना लाइन खूप असेल तेव्हा आताच ठरवा. त्यामुळे सगळ्या लोकांना दिसत होते की पैसे जास्त घेत आहेत तरी सगळ्यांनी टूर कंपनीचे लोकांवर विश्वास ठेवून पैसे दिले.
शिबानीने पालखीतून जायचे ठरवले आणि मी चालत.
सगळे लोक साधारण 4.30 वाजता सोनमर्ग चे निसर्ग सुंदर लोकेशन वरील हॉटेल वर पोहोचलो होतो. चेक इन करून जरा आराम करू म्हणलो तर जेवायची वेळ झाली.बरोबर न्यायची बॅग/सॅक, गरम कपडे, पावसाळी रेनकोट, बूट, जास्तीचे मोजे इत्यादी सर्व बॅगेत भरून घेतले तो पर्यंत जेवणाची वेळ झाली.
जेवण करून झोपायला गेलो असता रात्री 10 वाजता परत आलेल्या एका बंगाल मधील ग्रूपचे लोकांची बडबड पॅसेज मधे जोर जोरात सुरू होती. शेवटी जाऊन सांगितले की आम्हाला रात्री 12 वाजता वर जाणे साठी निघायचे आहे जरा झोपू द्या. ते गप्प बसले आणि एका रम मधे गेले पण झोप मोडली होती ती काही परत लागली नाही.
शेवटी 12 वाजता अंघोळ करून तयार झालो आणि एक वाजता सगळे रेडी झालो. तर आम्हाला टूर ऑर्गनायझरने सांगीतले की घेऊन जाणारी बस आलीच नाही. जरा वाट बघू.
वाट बघण्यात एक दीड तास गेला. शेवटी चहा मागवला आणि मग बस आली.
बसने निघालो असता पार्किंग क्रमांक तीनचेही अलीकडे आमची बस थांबली.
पुढे सर्व वाहने थांबली होती. चौकशी केली असता कळले की मिलिटरीचा कॉन्व्हॉय (सर्व मिलिटरी गाड्या एकत्र जाणे) जात आहे आणि लवकर बस सोडणार नाही.
मग काय अंधारातच पाय पिट सुरू झाली. एक दोन किमी चालून गेल्यावर बालतालचे एक एन्ट्री गेट लागले.
तिथून पुढे जाण्यासाठी साधारण दोन किमी आम्हाला एक छोटी गाडी मिळाली. त्याने बालताल मुख्य एन्ट्री गेट वर सोडले. तिथे आमच्या गळ्यातील आर एफ आय डी तपासून पुढे सोडले आणि आमचा अमरनाथ दर्शन साठी ट्रेक सुरू झाला. शिबाला पालखीत बसवून आम्ही निघालो.
जरा पुढे गेलो तर भले मोठे भंडारे/लंगर लागले. तिथे खायला प्यायला भरपूर होते, दोन भाज्या, भात, रोटी/पुरी, पापड, दोन स्वीट, सलाड, चहा, कॉफी अगदी सर्व होते. शिवाय मसाला डोसा, भेळ, गरम पोहे अगदी सर्व होते आणि सर्व मोफत शिवाय अगदी आग्रह करून देत होते.
आम्ही चहा पोहे खाल्ले आणि पुढे मार्गक्रमण सुरू केले. पुढे गेल्यावर धामेल चे गेट लागले तिथे आर एफ आय डी स्कॅन करून, बॅग स्कॅन करून आम्हाला पुढे सोडण्यात आले.
पायी जाताना प्रत्येकाचा स्पीड वेगळा होता त्यामुळे आम्ही सर्व जण मागे पुढे झालो. मी थोडा पुढे होतो. पहिले तीन किमी आणि अजून गेट पासून १४ किमी अंतर चालून परत पायीच यायचे होते.
दोन रात्री सलग झोप म्हणून अजिबात झाली नव्हती, त्यात प्रवास करून आलो होतो त्यामुळे प्रचंड थकलो होतो.
पहिले ६ किमी गेल्यावर मी बरारी येथे खाण्यासाठी थोडे थांबलो, त्यानंतर परत पुढे गेल्यावर रेल पटरी लागले तिथे थांबलो, रस्त्यात घोडे आणि पालखी यांच्या साठी एक बाजू सोडावी लागते, crpf आणि जवान लोक यांचा कडक बंदोबस्त होता आणि अगदी प्रत्येक ५० मीटर वर ते पहारा देत होते. रस्त्यात बऱ्याच ठिकाणी लँड स्लाईड मुळे रस्ते खराब होते त्यामुळे तिथे थांबून दिले जात नव्हते. लोक दामले की तिथे बसायला गेले तरी जवान त्यांना तिथे बसून देत नव्हते कारण वरून कधी दगड घसरून येतील आणि पडतील हे कोणी सांगू शकत नव्हते.
रस्त्यात मधे मधे काश्मिरी मुस्लिम लोक केळी, मक्याची कणसे, बिस्कीट पुडे आणि चहा कोल्ड्रिंग विकत होते. लंगर मुळे त्यांना ग्राहक जास्त नव्हते पण दमल्यावर लोक तिथूनच खरेदी करत होते. खूप महाग विक्री होत होती कारण खालून पाठीवर आणावे लागते. गाडी वर येत नाही.
साधारण १० किमी चढून वर गेल्यावर एक देवीची मूर्ती जी खडकात उंचावर आहे ती लागते. लोक भक्ती भावाने नमस्कार करतात. तिथूनच अमरनाथ ची गुहा लांबवर दिसते.
इथून पुढे जरा उतार सुरू होतो त्यामुळे स्पीड वाढते. पुढे गेल्यावर संगम म्हणून एक ठिकाण आहे तिथे चंदनवाडी, पहलगाम, पंचतरणी येथून आलेले लोक भेटतात. त्यांना तीन दिवस लागतात.
पुढे गेलो असता गुहेच्या पायथ्याशी भरपूर लंगर लागलेले आहेत, दुकाने आहेत, तिथेच चप्पल बूट आणि बॅग एका लॉकर मधे ठेवावे लागतात.
गुहेकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण ४०० पायऱ्या आहेत. मधे पाणी पिण्यासाठी मिळते. उत्तम व्यवस्था अमरनाथ श्राइन बोर्डाने केली आहे.
आम्ही सकाळी ४.३० वाजता चालल्या सुरू केलेले तेव्हा कुठे दुपारी १.० वाजता गुहे जवळ पोहोचलो.
गुहेजवळ थोडी जास्तच गर्दी होती. त्यामुळे साधारण २० ते २५ मिनिटात आम्ही दर्शन घेतले. अमरनाथचे बर्फाची पिंडी यावेळी चार पाच दिवसातच गरमी मुळे वितळली परंतु तिथे असलेली पांढरी आणि काळी कबुतरे, सदर बर्फ ज्या पासून शिवलिंग झाले होते त्याचे दर्शन झाले. प्रथम नंदीचे दर्शन केले.
लोक खूप भक्ती भावाने दर्शन घेत होते. दर्शन झाल्यावर बोर्डाकडून एक खडीसाखर पुडीचा प्रसाद दिला जातो.
एकंदर खूप छान वातावरण आम्हाला जाताना लागले. दर्शन घेताना तिथून लवकर निघून जा असे सांगण्यात येत होते कारण वातावरण बदलले होते आणि पाऊस सुरू झाला होता.
परत १४ किमी जायचे आणि आधी चार किमी चढण चढायची म्हणजे थोडे अंगावर येत होते पण काहीच करू शकत नव्हतो.
दर्शन घेऊन पायऱ्या उतरल्यावर एका लंगर.मधे गेलो मस्त गरम दूध, रोटी भाजी, भात वरण आणि गोडा शिरा घेतला.
जेवण झाल्यावर थोडी तरतरी आली. सदर लंगर/भंडारा हा मुंबई मधील लोकांनी लावला होता त्यामुळे मराठी बोलणे झाले, बरे वाटले.
मग सुरू केला परतीचा प्रवास.
चढ चढताना खूपच दमायला झाले होते पण कुठेही न थांबता चढत राहिलो. त्यामुळे वर तर पोहोचलो. आता काय उतारच होता कारण येताना चढावर खूप घाम गाळला होता. साधारण गुहेपासून ८ किमी आल्यावर मात्र खूपच दमलो म्हणून एका ठिकाणी थांबून लिंबू सरबत घेतले तर पठ्याकडे साखर संपली होती मग काय लिबू पाणी मिठाचे घेतले.
एक केळ खाल्ले आणि परत वाटचाल सुरू केली.
पाऊस पडत होता त्यामुळे खूप घसरत होते, उतार असला तरी चिखल झाला होता त्यामुळे पडता पडता वाचत होतो. बरोबर ट्रेकिंग स्टिक होती त्यामुळे तिचा प्रत्यक्ष वापर प्रथमच केला पण त्याचा खूप फायदा झाला कारण आधी स्टिक टिकवायची मग पाय पुढे टाकायचा यामुळे घसरणे कमी झाले. पण तरीही चालण्याचा स्पीड कमी झाला होता. त्यातच घोडेवाले, डोली वाले यांच्या कडून बाजूला व्हा असे सारखे ऐकत होतो. रस्त्यात कडेला पाण्याची पाईप लाईन आणि काही अंतरावर नळ ठेवले आहेत त्यातून पाणी भरून घेता येत होते.
मुस्लिम लोकांनी जी छोटी दुकाने लावली होती ते कचरा खाली फेकत होते. मी जरा टोकले पण पुढे गेल्यावर पाहिले तर कचरा खाली गेला होता.
लंगर / भंडारावाले हे मात्र सर्व कचरा एकत्र करत होते आणि जम्मू काश्मीर ग्रामीण विभागाने कचरा उचलण्याची सोय केली होती.
रस्त्यात मिलिटरीचे लोकांनी मेडिकल कॅम्प लावले होते तिथं ऑक्सिजन ची कुणाला आवश्यकता असेल तर ते देत होते, ors ची गरज असेल तर देत होते. माझ्या समोरच एका व्यक्तीला स्ट्रेचर वर घालून खाली पण घेऊन गेले. मिलिटरीला इमर्जेन्सी साठी हेली कॉप्टर ची सोय होती त्यातून ते अशा रुग्ण लोकांना घेऊन जात होते.
भारतीय सैनिकांमुळे कुठेही यात्रेत अगदी सुरक्षित वाटले.
रस्त्यात लोक आपल्याला घोडा हवा आहे का? पालखी हवी आहे का असे विचारत होते. आणि जेव्हा विचारले तेव्हा साधारण सरकारी रेट सांगत होते.
तेव्हा आमच्या यात्रा कंपनी कडून जास्त पैसे घेण्यात आले आहेत याची प्रत्येकालाच जाणीव झाली. कारण प्रत्येक घोडा आणि पालखी वाल्यांकडून यात्रा कंपनीने पैसे स्वतः गोळा केले होते.
मजल दर मजल करत धामेल गेट पाशी आलो आणि आर एफ आय डी परत देऊन पुढे निघालो.
आता गाडी पार्किंग पर्यंत अजून तीन किमी जायचे म्हणजे जीवावर आले होते.
पावसामुळे पूर्ण भिजलो होतो, डोक्यावरील टोपी, पँट, अंगातील जॅकेट, सॅक सगळे पूर्ण भिजले होते.
तिथे एक लंगर दिसले मग त्यात जाऊन जरा चहा प्यावा म्हणून गेलो. पण दोन रात्रीचे जागरण, सारखा चहा, जाऊन येऊन ३० किमी चालणे यामुळे खूप थकायला झाले होते. मग थोडा वेळ बसून जरा पोटात घातले आणि चहा न पिताच बाहेर पडलो.
बर्फानी बाबांनी एक सोय करून ठेवली होती. एक छोटा ट्रक बाहेर उभा होता त्यात मागे लोकांना बसवले होते आणि मी चालत जाताना त्या ट्रक मालकाने मला म्हणले बाबा आपण पूर्ण भिजले आहात आपणास बालताल पार्किंग जवळ सोडतो.
मला एका खुर्चीवरून त्या ट्रक मध्ये मागे बसवले आणि ट्रक चे फाळक्यावर बसून आमची स्वारी निघाली. ट्रक जोरात असल्यामुळे डोके सांभाळले पण गर्दी असल्यामुळे मान तिरकी करून बसलो असता मानेवर ट्रक चे ब्रेक मुळे लोखंडी गार्ड चा जोर पडत होता.
शेवटी पार्किंग आले. पार्किंगचे जवळ पोहोचलो तर पावसाचा जोर खूप वाढला होता. बस कुठे लावली आहे ती सापडत नव्हती. ड्रायव्हर शी बोललो असता त्याने इकडे तिकडे आहे असे करत शेवटी बस जवळ पोहोचलो असता बस निघायला खूप वेळ होता म्हणून शेअरिंग मधे जाण्यासाठी एक छोटी गाडी घेऊन यात्रेकरू कंपनीची मॅनेजर कम मालकीण भेटली त्यामुळे तिथून आम्ही इतर दोघांना घेऊन सोनमर्ग येथे पोहोचलो. हॉटेल वर शीबानी पालखी मुळे लवकरच आली होती.
खूप थंडी वाजत होती त्यामुळे कपडे बदलून थोडे अंथरुणात घुसलो तेव्हा कुठे थंडी थांबली.
अशा रीतीने अमरनाथ यात्रा एका दिवसात पायी पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले. भगवान शंभो, शंकर, महादेव, बर्फानी बाबा यांच्या मुळे आणि त्यांच्याच कृपेने यात्रा पूर्ण झाली त्याचे समाधान मिळाले.
विजय सागर
No comments:
Post a Comment