अरुण देशपांडे यांची सोला(र)पूरची प्रयोगशाळा...
सोलापुरात येण्याआधी अर्धा तास अंतरावरचे हे 'प्रयोग'स्थळ सर्वात जास्त प्रेक्षणीय आहे...
अरुण देशपांडे या तपस्वी व्यक्तीच्या प्रयोगशील कार्याचा आलेख या लेखात आहे...
"जूनचा पहिला आठवडा. मान्सूनचा पत्ता नाही. उन्हाळा संपत आलेला, नद्या-नाले कोरडे ठणठणीत. भगभगीत उजाड माळरान. एखाद्या गावाजवळ थोडीफार दिसणारी हिरवी शेती. बाकी सगळीकडे पिवळ्या रंगाचे निर्विवाद वर्चस्व. अशा रस्त्यावरून जात असताना मध्ये जंगलच म्हणावे इतकी घनदाट झाडी असलेला पट्टा… हीच ती सोला(र)पूरच्या अरुण देशपांडे नामक खटपट्या माणसाची प्रयोगशाळा!
सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यात अंकोली गावाच्या अलिकडे अरुण देशपांडे यांचे विज्ञानग्राम दिसते. झाडांनी गच्च भरलेली अशी ती एकमेव जागा. आत असंख्य पाट्या. शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाला मिळणारा भाव, 1971मध्ये एक किलो धान्याच्या किमतीत किती लिटर डिझेल मिळत होते - किती साखर मिळत होती आणि आता काय परिस्थिती आहे? मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशी शहरे ग्रामीण भागातील विनाशाला कशी कारणीभूत आहेत वगैरे मुद्दयांच्या पाटया तेथे आहेत. अशीच एक पाटी – तीवर ‘मुक्काम पोस्ट अंकोली, सोला(र)पूर जिल्हा’ असे लिहिलेले आहे!
तेथील जमीनीवर झाडाचा पालापाचोळा पडून पडून, त्याची माती होत ती भुसभुशीत व सुपीक स्पंजसारखी झाली आहे. देशपांडे सांगतात, “आत्ता पडतो त्याच्या दसपट पाऊस येथे पडला, तरी पूर येणार नाही, कारण सगळं पाणी हा जमिनीचा स्पंज शोषून घेईल आणि पाऊस कमी आला तरी इतके पाणी जमिनीत मुरलेले आहे की चिंताच नाही.”
आम्ही गेलो त्या वेळी उन्हाळा संपत आला होता व पावसाळ्यास आरंभ व्हायचा होता. त्या वेळी सगळीकडच्या विहिरी कोरड्या पडलेल्या असतात. देशपांडे यांची सुमारे वीस फूट व्यासाची आणि सत्तर फूट खोल विहीर पाण्याने पूर्ण भरलेली होती. आजुबाजूच्या दगडांतून पाणी झिरपत असल्याचा आवाज त्या विहिरीत घुमत होता. झिरपून येणारे ते पाणी विहिरीत भरण्याची प्रक्रिया अव्याहतपणे चालू असते.
जमिनीवर एकूण तीन विहिरी आहेत. एका क्षमतेपर्यंत विहीर भरेल आणि मग पाणी जमिनीखालील झ-यांतून इतरत्र निघून जाईल. तसे झाले, तर ऐन वेळेला गरज असताना विहिरीत पाणी कमी असण्याची शक्यता. म्हणून मग देशपांडे यांनी मोठे शेततळे खोदले आहे. तळ्याच्या तळाला प्लास्टिक शीट्स घालून पाणी झिरपून जाणार नाही याची काळजी घेतली आहे. (खरे तर, प्लास्टिक वापरणे देशपांडे यांच्या तत्त्वज्ञानात बसत नाही. पण उदात्त हेतू लक्षात घेता त्याकडे दुर्लक्ष केलेले बरे.) तळ्याच्या पृष्ठभागावर मोहरीच्या तेलापासून बनवलेले नैसर्गिक असे द्रावण सोडले आहे, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही. पाच एकर पसरलेले (सुमारे दोन लाख चौरस फूट) आणि पंचवीस फूट खोल असे ते तळे. विहीर भरली की मग ते तेथील पाण्याचा उपसा करून सगळे पाणी तळ्यात टाकतात. असे वर्षभर सुरू असते. सकाळी उपसा करून पाणी शेततळ्यात साठवायचे. संध्याकाळी विहीर पुन्हा भरलेली असते. दुस-या दिवशी पुन्हा सकाळी शेततळ्यात पाणी भरायचे. असे ते चक्र आणि त्याचा परिणाम म्हणजे सगळीकडे दुष्काळ आणि शेतीला, प्यायला पाणी नसल्याची ओरड होत आहे, पण देशपांडे यांच्या विज्ञानग्रामात पन्नास लाख घनफूट (14,15,84,000 लिटर) पाण्याचा साठा! शिवाय विहिरींमध्ये रोज जे पाणी झिरपत आहे, ते वेगळेच. त्या तळ्याला ते म्हणतात ‘वॉटर बँक’. ज्याला पाणी हवे, तो काढू शकतो त्यातून – कर्ज म्हणून! पण परत तेवढेच पाणी त्या बँकेत भरण्याची जबाबदारीही त्याच माणसाची. तेथे इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘प्रोजेक्ट’ म्हणून पाण्याचा उपसा करण्यासाठी साधासा पंप तयार करून बसवला आहे. त्याला वीज वापरण्याची गरज नाही. त्या पंपाला बैल जोडायचा, तो गोल फिरतो आणि पाण्याचा उपसा होतो. शिवाय वॉटर बँक जमिनीच्या उंचावरच्या भागात खोदलेली असल्याने साध्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार इतर भागांत पाणी पोचवता येते. तेथेही वीज लागत नाही.
देशपांडे यांचे घर एकदम साधे आहे. मोठा गोल चर खणून त्यात त्यांनी मोठी झाडे लावली. ती झाडे वाढल्यावर त्यांना आतील बाजूला खेचून बाहेरच्या बाजूने फांद्या छाटून मोठा घुमट तयार केला आहे आणि त्या सगळ्या झाडांच्या बुंध्यांना कापडाने गुंडाळले. गरज असेल तेथे शेणाने सारवले आहे. झाडांच्या फांद्यांचाच घुमट केल्याने डोक्यावर नैसर्गिक अच्छादन आहे. तरी उतरते कापड टाकले आहे. गरज असेल तेथे बांबू वापरून आधार वगैरे दिला आहे. तो बांबू त्यांच्याच जमिनीतील आहे. तो इतका मुबलक आहे की तशी अजून दहा घरेही सहज बांधून होतील. बहुतांश गोष्टी नैसर्गिक. देशपांडे यांच्या जमिनीच्या बाहेर बनलेल्या फार थोडया गोष्टी त्या सगळ्या बांधणीत वापरलेल्या. ज्या बाहेरच्या गोष्टी वापरल्या, त्याही लोकांनी भंगारात फेकलेल्या अशा तारा, गंजलेल्या बिजाग-या, पत्रे इत्यादी. गांधीजींनी सांगितले होते, “माझ्या दृष्टीने तो खरा हुशार वास्तुविशारद, जो माझ्या चालण्याच्या अंतरात उपलब्ध होणारी सामग्री वापरून माझे घर बांधून देऊ शकतो!” गांधीजींच्या त्या विचारांचा पगडा देशपांडे यांच्यावर आहे.
त्यांच्या त्या विलक्षण घरात थंडगार पाण्याचे माठ भरून ठेवलेले. घरात मध्यभागी जुन्या काळी असे तशा प्रकारचा मोठा पंखा लटकावलेला. तो फिरवायला दोरी बांधलेली. बसल्या जागी दोरी हातात धरून ओढल्यावर तो अजस्र पंखा लीलया फिरतो आणि खोलीभर वारा पसरतो. त्याला वाळ्याचे पडदे लावण्याची सोय आहे. त्यावर थोडे पाणी टाकून मग वारा घेतल्यावर एकदम झकास कूलर तयार. त्या सगळ्यात कोठेच विजेचा वापर नाही.
घराच्या दारात विविध प्रयोग करून दाखवण्यासाठी उपकरणे. त्यात सायकल चालवून वीज तयार करण्याचा प्रयोग तर विशेषच. दैनंदिन जीवनात कामासाठी आपण वापरतो ती सगळी ऊर्जा सायकल चालवून ‘शरीर ऊर्जे’मध्ये मोजली, तेव्हा लक्षात आले की वीजवापर हा काही किफायतशीर मामला नाही! तोच त्या प्रयोगांचा मुख्य उद्देश आहे. सायकल मारून वीज पैदा करून पाणी चढवण्याचा, पाणी तापवण्याचा प्रयोग झाला, लाकडाचा तुकडा साध्या करवतीने कापण्याशी तोच विजेवर चालणा-या करवतीने कापून तुलना करून बघितली. दोन्हीकडे एकूण लागणारी ऊर्जा बघता, विजेच्या बाबतीत ती जास्त लागते हेच लक्षात आले.
“तुमचे एका दिवसाचे मलमूत्र तुम्हाला शंभर दिवसांनी तुम्हालाच एक वेळचे उत्तम जेवण देऊ शकते” अशी प्रस्तावना करून देशपांडे यांनी त्यांनी केलेल्या एका प्रयोगाची माहिती दिली. साधारण पन्नास-साठ शालेय मुलांना एकत्र करून त्यांना त्यांचे एक दिवसाचे मलमूत्र एका पोत्यात भरण्यास सांगितले. प्रत्येक पोत्यात भरपूर गवत भरले. थोडे पाणी टाकले आणि मग पोते बंद करून तीन-चार दिवस तसेच ठेवले. तीन-चार दिवसांनी एकेक पोते उघडले. त्यात माती तयार झालेली होती. त्या मातीत मक्याचे रोप लावले. आणि पुढचे अडीच-पावणेतीन महिने फक्त त्या रोपाला नेमाने पाणी घातले. शंभर दिवसांनतर प्रत्येक रोपाला सुंदर चवदार अशी मक्याची चार-पाच कणसे आली आणि त्याच मक्याच्या भाकऱ्या जेवणात सगळ्या मुलांनी खाल्ल्या! अशा प्रयोगांनी त्यांचे सिध्दान्त सिध्द करून दाखवणा-या अरुण देशपांडे यांनी आणि त्यांना तितक्याच जिद्दीने साथ देणा-या सुमंगला देशपांडे यांनी, गेली सत्तावीस वर्षे कष्ट करून उभारलेले ‘विज्ञानग्राम’ ही अभुतपूर्व प्रयोगशाळा आहे.
“जगातील सगळ्यात उत्तम सौर पॅनेल कुठे बनते माहिताहे का?” … प्रत्येक झाडाचे प्रत्येक पान हे जगातील सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात प्रभावी सौर पॅनल आहे” आमच्या डोक्यातही नसणा-या गोष्टी अरुण देशपांडे यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली. “प्रत्येक झाड सूर्यप्रकाशापासून ऊर्जा निर्माण करते. इतकी ऊर्जा, की झाड स्वत: तर जगतेच, पण त्याबरोबर असंख्य प्राणिमात्रांना आणि जिवांना जगवते इतकी ऊर्जा प्रकाशसंश्लेषण (photosynthesis) प्रक्रियेमध्ये तयार होत असते! शिवाय, ती ऊर्जा तयार होत असताना झाडे प्राणवायू बाहेर टाकत असतात. म्हणजे पर्यावरणाला पूरक अशी ती ऊर्जा तयार होत असते!”
“पाणी खेचण्याचा सर्वात उत्तम पंप कोणता माहीत आहे काय?” तेच हसून पुढे म्हणतात, “झाडाचे खोड आणि मुळे! बघा की, कोठले कोठले थेंब थेंब पाणी शोषून घेते झाड. मग आम्ही विचार केला की त्याचाच वापर करून झाडांना पाणी का देऊ नये?…” देशपांडे यांनी एक पाईप घेतला. साधारण पाच मिलिमीटर व्यासाचा. त्याच्या तोंडाशी मातीची सच्छिद्र विटी बसवलेली.” पाईपचे दुसरे टोक पाण्याने भरलेल्या तळ्यात वा विहिरीत सोडा आणि ती विटी तुमच्या झाडाच्या मुळाशी खड्डा करून त्यात टाका. खड्डा बुजवून टाका. झाडाची मुळे त्या विटीमार्फत पाईपमधून आपल्याला हवे तितके पाणी खेचून घेतील…” वरवर पाहता अतिशय सोपी पण भन्नाट अशी पाणी देण्याची ती पध्दत आहे. पिकांना पाणी द्यायचे असेल तर एकच मोठा पाईप नदीत/कालव्यात सोडून ठेवायचा आणि त्याला असंख्य छोटे पाईप जोडायचे, ज्यांच्या दुसऱ्या बाजूला मातीच्या विट्या बसवलेल्या असतील. आणि त्या विट्या दोन-तीन रोपांमध्ये एक अशा पध्दतीने जमिनीत लावलेल्या असतील. देशपांडे यांच्या सांगण्यानुसार एक टन ऊसासाठी सामान्यत: पाटाने पाणी दिल्यावर दिवसाला तीनशे लिटर पाणी लागते. अगदी टायमर बसवून, पंप लावून आधुनिक पध्दतीने विजेचा वापर करून ठिबक सिंचनाने पाणी दिले, तर साधारणपणे दीडशे लिटर पाणी लागते. पण विटीच्या पध्दतीने पाणी दिले, तर जेमतेम पस्तीस लिटर पाणी पुरते!
देशपांडे हे जगण्याबाबत, समाजजीवनाबाबत नवीन आयडिऑलॉजी मांडतात. खरे तर, त्यात नवीन असे काही नाही. महात्मा गांधी यांनी जे सांगितले, तेच नव्याने, आजच्या भाषेत देशपांडे सांगतात.
देशपांडे सांगतात, “एखादी गोष्ट करताना त्यातील ‘एम्बेडेड एनर्जी’ तपासायला हवी. अमुक गोष्ट तयार होत असताना, ती माणसाच्या हातात येताना एकूण किती आणि कोणत्या स्वरूपातील ऊर्जा खर्च झाली, याचा विचार करायला हवा. सगळ्या गोष्टी जर पाण्याच्या आणि ऊर्जेच्या खर्चाच्या एककात मोजून तपासल्या, तर माणूस किती जास्त उधळपट्टी करत आहे ते लक्षात येईल.”
देशपांडे म्हणाले, “एक सौर पॅनल बनवण्यासाठी एकूण लागणारी ऊर्जा जेवढी असते, तेवढीही ऊर्जा माणूस त्याच्या संपूर्ण आयुष्यात निर्माण करत नाही. मग या सौर पॅनल्सचा उपयोगच काय? सौर पॉवर प्लांट्सवर चालणारा सौर पॅनल्स बनवणाराच संपूर्ण कारखाना बनला पाहिजे आणि तो कारखाना चालवण्यासाठी वापरल्या गेलेल्या सौर पॅनल्सपेक्षा जास्त पॅनल्स त्या कारखान्यातून तयार होऊन बाहेर पडले पाहिजेत. असे झाले, तरच सौर प्लांट्सचे मॉडेल शाश्वत आहे. जे सौर ऊर्जेबाबत, तेच पवन ऊर्जेबाबत. अणू ऊर्जा तर सर्वात फसवी. कारण अतिशय स्थिर असलेले विखुरलेले युरेनियम अणू एकत्र आणायचे, ते शुध्द करायचे आणि तो अणू कृत्रिम रीत्या अस्थिर करून ऊर्जा पैदा करायची. या सगळ्या प्रक्रियेचे एकूण गणित बघितले, तर ‘एम्बेडेड एनर्जी’ निर्माण होणा-या ऊर्जेपेक्षा जास्तच आहे असे लक्षात येते…”
अर्बन आणि रूरल – म्हणजे शहरी आणि ग्रामीण यांचा मिलाफ साधणारी ‘रुर्बन’ जीवनशैली आजच्या जगाला अंगीकारल्याशिवाय पर्याय नाही असे देशपांडे ठामपणे मांडतात.
ते म्हणतात, “ सद्य परिस्थितीत बदल करायचा असेल, शेतक-याची आणि खेडयांची पिळवणूक व शोषण थांबवायचे असेल, तर शेतक-यांनी स्वयंपूर्ण बनून संप पुकारला पाहिजे. शेतकरी संपावर गेले पाहिजेत. एकदा अन्न मिळणे बंद झाले की शहरी लोक सोन्याचा भाव द्यायला लागतील एकेका दाण्याला… शेतक-यांची पिळवणूक होते, ती तो संप पुकारत नाही म्हणून.” देशपांडे पुढे म्हणतात, “पाण्याच्या बाबतीत ‘वॉटर बँकचे’ मॉडेल राबवून स्वयंपूर्ण होऊन आणि शहरी जीवनशैलीचा पूर्ण त्याग करून शेतकरी संपूर्णपणे स्वयंपूर्ण जगू शकतो.”
त्यांनी ते त्यांच्या राहण्यातून बऱ्याच अंशी दाखवून दिले आहे. ऐन उन्हाळ्यात त्यांच्या तळ्यात पाणी कसे आहे, त्यांचे जंगल हिरवेगार कसे आहे, त्यांच्या विहिरींना पाणी कसे आहे, ते बघायला लांबलांबहून लोक येत असतात. देशपांडे यांचे ‘रूर्बन मॉडेल’ यशस्वी व्हायला हवे असेल, तर साधारण पन्नास कुटुंबांनी एकत्र राहवे, असे ते सांगतात. ते एका आगळ्यावेगळ्या ‘कम्यून’चीच संकल्पना मांडत असतात.
प्रत्येक कुटुंबाचे शेत वेगळे असले, तरी ती कुटुंबे पाणीवापर वगैरे गोष्टींनी एकमेकांशी जोडलेली असतील. एका कम्यूनमध्ये एखादा शिक्षक असावा, एखादा डॉक्टर असावा, इत्यादी. प्रत्येक कुटुंब रोज जेमतेम चार-पाच तास शारीरिक कष्ट करून स्वत:ला किमान वर्षभर पुरेल इतके अन्नधान्य सहज पिकवू शकते. इतकेच नव्हे, तर कापसासारखे पीक घेऊन वस्त्राची गरजही भागवू शकते. निवाऱ्यासाठी आवश्यक लाकूड आणि बांबू यांसारख्या गोष्टी त्याला स्वत:च्या जमिनीवर उपलब्ध होतील.
एकदा जीवनशैली बदलली की विजेवर असणारे आणि पर्यायाने बाहेरच्या जगावर असणारे अवलंबित्वदेखील कमी होईल अशी देशपांडे यांची मांडणी आहे. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत ‘टॉलस्टॉय फार्म’ हा प्रयोग केला होता. तो काहीसा असाच होता.
अरुण देशपांडे हा एक प्रयोगशील खटपटया मनुष्य आहे. प्रयोगातून, स्वत: त्यात सामील होऊन त्यांनी ते मॉडेल तयार केले आहे. मात्र त्यांनी ते मॉडेल पोपटराव पवार, अण्णा हजारे, देवाजी तोफा यांच्याप्रमाणे लोकसमुहांना एकत्र करून यशस्वी करून दाखवलेले नाही. कारण देशपांडे यांचे मॉडेल आकर्षक असले, तरी आव्हानात्मक आहे."
- अरुण देशपांडे
9822174038
मु. पो. अंकेली, ता. मोहोळ, जिल्हा सोलापूर.
arun@prayog.org
('साप्ताहिक विवेक’ मध्ये ३ ऑगस्ट २०१४ च्या अंकात छापुन आलेला हा लेख आहे.)
No comments:
Post a Comment